उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था, रस्ते खड्डेमय; नागरिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:36 PM2022-07-08T16:36:50+5:302022-07-08T16:37:47+5:30
उल्हासनगर महापालिकेतील ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटची असूनही रस्त्याची दुरावस्था झाल्याने, बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले.
उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला. मात्र दुरुस्त केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालक व नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर दुरुस्ती रस्ते एका वर्षाच्या पूर्वी खराब झाल्यास रस्स्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारांची असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेतील ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटची असूनही रस्त्याची दुरावस्था झाल्याने, बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था होऊ नये, यासाठी महापालिकेने पावसाळ्या पूर्वी रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ८ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी काही रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरले होते. मात्र संततधार पावसाने रस्त्याची दुरावस्था झाली असून बहुतांश रस्ते खड्डेमय झाले. रस्त्याच्या दुरावस्थेने महापालिका बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने, रस्त्याची दुरावस्था झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका बांधकाम विभागावर केला.
शहरातील लालचक्की रस्ता, नेताजी चौक ते तहसील कार्यालय, कुर्ला कॅम्प रस्ता, पाच दुकान रस्ता, मोर्यानगरी रस्ता, डॉ आंबेडकर ते महात्मा फुलें कॉलनी रस्ता, खेमानीं रस्ता, जुन्या राणा डम्पिंग रस्ता, कॅम्प नं-५ डम्पिंग रस्ता, मासे मार्केट रस्ता, गुलशननगर रस्ता, सी ब्लॉक रस्ता, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन रस्ता, काजल पेट्रोल पंप रस्ता, श्रीराम चौक ते व्हिटीसी मैदान रस्ता, डॉल्फिन रस्ता, मुख्य मार्केट मधील रस्ते आदी असंख्य रस्त्याची दुरावस्था झाली. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती केलेल्या राष्ट्याचीही दुरावस्था झाली असून इतर रस्ते खड्डेमय झाले. रेती, दगड आदीने पावसाळ्यात खड्डे भरावे अशी मागणीने जोर पकडला आहे.