हे तर शहराचं दुर्दैवच - आमदार प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 09:22 PM2018-01-20T21:22:40+5:302018-01-20T21:23:54+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते कामात सहकार्य करीत नसल्याच्या मुद्यावर शुक्रवारपासुन आपापली दालने बंद करुन प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन छेडले आहे.

This is the bad luck of the city - MLA Pratap Sarnaik | हे तर शहराचं दुर्दैवच - आमदार प्रताप सरनाईक

हे तर शहराचं दुर्दैवच - आमदार प्रताप सरनाईक

Next

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते कामात सहकार्य करीत नसल्याच्या मुद्यावर शुक्रवारपासुन आपापली दालने बंद करुन प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन छेडले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वृत्तीमुळे शहर बदनाम होत असुन ते शहराचं दुर्दैव ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे. 
शहरात अशा प्रकारचं काम यापुर्वीच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही. पालिकेसह राज्यात तसेच केंद्रात सत्ता असतानाही पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनाला कधीही वेठीस धरलेले नाही. यंदा मात्र अच्छे दिनच्या मस्तीत पालिकेतील सत्ताधारी बेकायदेशीर कामांसाठी प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहेत, हे सत्ताधाऱ्यांचे दुर्दैव आहे. भाजपाची केंद्रासह राज्यात सत्ता असतानाही प्रशासनाला आपल्या भोवती पिंगा घालण्यास भाग पाडणारे आ. नरेंद्र मेहता हे पालिकेला आपली स्वत:ची खाजगी मालमत्ता बनविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. 

यापूर्वी त्यांनी पालिकेचा लोगो स्वत:च्या सेव्हन ईलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावे करण्याचा प्रयत्न केला. त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांचा तो डाव उधळला गेला. यंदा एकहाती सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचविण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचा कारभार आपल्याभोवती केंद्रीकृत करुन आपल्या नेतृत्वाखाली श्रमिक कामगार संघटनेमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. त्याला पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते विरोध करीत असल्यानेच सत्ताधाऱ्यांनी मेहता यांच्याच निर्देशानुसार दालन बंद आंदोलनाचे नाटक सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशात व राज्यात पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

याउलट मेहता हे पालिकेत भ्रष्टाचार मार्गाचा अवलंब करण्यास प्रशासनाला भाग पाडत आहेत. हे कदापि सहन केले जाणार नाही. त्यांच्या या स्वार्थी व एकतर्फी कारभारामुळे शहरवायिसांत प्रचंड नाराजी पसरली असताना त्यांनी प्रशासनाविरोधात सुरु केलेल्या या असहकार आंदोलनामुळे पक्षाचेच वाभाडे काढले जात आहेत. लोकप्रतिनिधी लोकसेवक असल्याने त्यांनी लोकाभिमुख विकास साधणे आवश्यक आहे. जनतेने त्यांना एकहाती सत्ता देऊन शहराचा विकास साधण्याची संधी दिली आहे. त्या संधीचा अर्थ भ्रष्ट मार्ग होत असेल व त्यात स्वार्थीपणाचा शिरकाव केला जात असेल तर त्यात शहर व जनतेचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होईल. त्याची जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवावी अन्यथा जनभावना तीव्र झाल्यास त्याचा कधीही उद्रेक होईल. त्यावेळी मात्र सत्ता टिकविणे भाजपाला कठीण होईल. 

त्यामुळे भाजपाने प्रामुख्याने नरेंद्र मेहता यांनी सत्तेचा माज बाजुला सारुन प्रशासन व विरोधी पक्षांना सोबत घेऊन शहराचा विकास साधावा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.  सत्ताधाऱ्यांनी सुरु केलेले हे नाटकी आंदोलन दोन दिवसांत मागे न घेतल्यास जनतेसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या-त्या दालनाचा ताबा घेण्यास लावू. सेनेच्या लोकप्रतिनिधींचा कारभार देखील याच दालनांमधून सुरु केला जाईल, असा इशारा सरनाईक यांनी भाजपा सत्ताधाऱ्यांना दिला आहे. 

Web Title: This is the bad luck of the city - MLA Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.