ठाण्यात सेवा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या २१५ चालकांवर बडगा

By जितेंद्र कालेकर | Published: March 29, 2024 09:31 PM2024-03-29T21:31:07+5:302024-03-29T21:31:40+5:30

वाहतूक पोलिसांसह ‘ठामपा’ची कारवाई

Badga on 215 drivers who park their vehicles on service roads in thane | ठाण्यात सेवा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या २१५ चालकांवर बडगा

ठाण्यात सेवा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या २१५ चालकांवर बडगा

ठाणे : सेवा रस्त्यासह पूर्व द्रुतगती मार्गावर वाहने बेकायदा उभी करणाऱ्या तसेच नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखेने करुन अवघ्या एका दिवसात २१५ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने शुक्रवारी दिली.

मुंबई-नाशिक आणि मुंबई अहमदाबाद (घाेडबंदर रोड) या पूर्व द्रुतगती मार्गावर, तसेच या मार्गाच्या बाजूलाच असलेल्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने बेकायदा उभी केली जातात. यात बस, कार अशा वाहनांचा माेठ्या प्रमाणात समावेश असतो. काही वाहने अनेक दिवसांपासून उभी असून, काही वाहने भंगार झाल्याने एकाच जागी उभी केल्याचे आढळते. याच मार्गावर नो-पार्किंगमध्येही वाहने उभी केल्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागते. याबाबतच्या अनेक तक्रारी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्याकडे आल्या होत्या.
याचीच दखल घेत ठाणे पालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईमध्ये नौपाडा, राबोडी, वागळे इस्टेट, कासारवडवली, कापूरबावडी आणि कोपरी अशा सहा युनिटच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २८ मार्च रोजी एकाच दिवसात २१५ वाहनांवर कारवाई केली. यामध्ये नौपाडा २२, राबोडी- ३२, कापूरबावडी सर्वाधिक ७३, कासारवडवली- ५०, वागळे इस्टेट ३१, तर कोपरी युनिटने सात वाहनांवर कारवाई केली.

गुरुवारी सकाळच्या सत्रामध्ये नौपाडा, वागळे आणि कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही सर्व्हिस रोडवरील नो- पार्किंग झोनमधे उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. तसेच सायंकाळच्या सत्रात कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत घोडबंदर रोडच्या सर्व्हिस रोडवरील नो-पार्किंग झोनमधील वाहने हटवली.
डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा

Web Title: Badga on 215 drivers who park their vehicles on service roads in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.