कल्याण-डाेंबिवलीत भटकणाऱ्यांवर बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:44+5:302021-05-17T04:38:44+5:30
कल्याण : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू असतानाही काही ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ...
कल्याण : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू असतानाही काही ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मनपा अधिकारी आणि पोलीस विभागाला शनिवारी दिले होते. त्यानुसार शनिवारी संध्याकाळपासून कारवाईला प्रारंभ झाला होता. रविवारीही हे चित्र कायम होते. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन टेस्ट करून त्यात पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची थेट मनपाच्या क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली.
आयुक्त सूर्यवंशी यांनी ऑनलाइन बैठक घेऊन पुढील १५ दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेत मनपा ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि कोळसेवाडी पोलीस यांची संयुक्त कारवाई झाली. उद्घोषणेच्या माध्यमातून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. रविवारी सकाळी पश्चिमेकडील सहजानंद चौकात, महात्मा फुले चौकात पोलिसांनी नाकाबंदी करून भटकणाऱ्यांना ताब्यात घेतले. यात दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणांची संख्या अधिक होती. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, त्यांना ताब्यात घेऊन अँटिजन चाचणीसाठी त्यांची रवानगी महाजन वाडी हॉलमध्ये करण्यात आली. यात काही जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत असून त्याचा आकडा समजू शकलेला नाही. कल्याणप्रमाणे डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरही रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आणि मनपाचे ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पाटील, संजय साबळे, अरुण जगताप यांच्या वतीने दंडात्मक कारवाई आणि अँटिजन टेस्ट करण्यात आली.
------------------------------------------------------