बारमालकाकडून आयुक्तांची बदनामी, वादग्रस्त चित्रफीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:46 AM2018-01-18T00:46:39+5:302018-01-18T00:46:50+5:30
महापालिकेची कारवाई जिव्हारी लागल्याने बारमालक अश्विन शेट्टी याने आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदनामीकारक चित्रफीत व्हायरल केल्याचे उघड झाले आहे.
ठाणे : महापालिकेची कारवाई जिव्हारी लागल्याने बारमालक अश्विन शेट्टी याने आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदनामीकारक चित्रफीत व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये हा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर संबंधित बारमालकासह मनसेच्या एका कार्यकर्त्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणे महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्याकडे कामाला असलेल्या एका मुलीची चित्रफीत काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. आयुक्त आपल्याकडून मसाज करून घेतात, असा धक्कादायक दावा या मुलीने चित्रफितीमध्ये केला होता. या मुद्याचा दुरुपयोग करून काहींनी आयुक्तांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी आयुक्तांनी स्वत:च केली. खंडणीविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना खळबळजनक माहिती समोर आली.
महापालिकेने मध्यंतरी अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली. त्या वेळी उपवन परिसरातील ‘रेडबुल’ आणि ‘आईना’ बारवर महापालिकेने कारवाई केली होती.
चित्रफितीमध्ये आयुक्तांवर आरोप करणाºया मुलीचे घरही या कारवाईमध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते. महापालिकेची कारवाई जिव्हारी लागल्याने बारमालक अश्विन शेट्टी याने त्या मुलीला गाठले. तिला आयुक्तांवर गंभीर आरोप करण्यास सांगून तिची चित्रफीत तयार केली.
पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदनामी करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आली. ही चित्रफीत व्हायरल करण्यामध्ये मनसे कार्यकर्ते संदीप गोंडुकुबे यांचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे.
त्याअनुषंगाने दोघांविरुद्ध चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ५०० आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या चित्रफितीमुळे काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरात खळबळ उडाली होती. पालिकेतही हा चर्चेचा विषय ठरला होता.