बदलापूर : वीज ग्राहकाला ८२ हजाराचे बिल, महावितरणची थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:37 AM2018-01-22T02:37:11+5:302018-01-22T02:38:20+5:30
वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.
बदलापूर : वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.
बदलापूरच्या जाधव कॉलनीत राहणा-या निलीमा चिंदरकर यांना दर महिन्याला दीड हजाराच्या आतच वीज बिल येत होते. मात्र त्यांच्या मीटरमध्ये दोष आल्याने गेल्या महिन्याचे त्यांचे बिल तब्बल ८२ हजार आले आहे. विजेचा वापर हा घरगुती असतानाही त्यांना एका महिन्याचे विजेचे युनिट ५ हजार ६९३ दाखवले आहे. एवढे युनीट वापरलेच नाही तर मग इतके पडलेच कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. त्यांना एका महिन्याचे विजेचे बिलही ८२ हजार दाखवण्यात आले आहे. या बिलावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांच्या विजेच्या मीटरमध्ये बिघाड झालेला आहे. मात्र त्याची तपासणी न करता सरसकट बिल पाठवण्याचे काम महावितरणने केले आहे.
या प्रकरणी अधिका-यांना जाब विचारल्यावर त्यांनी लागलीच निम्मे बिल कमी करून ४० हजार बिल दिले. मात्र इतकी रक्कम भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे चिंदरकर यांनी स्पष्ट केले.
महावितरण विभागाच्या चुकीच्या यंत्रणेचा फटका हा नाहक ग्राहकांना बसत आहे. असे असताना त्यांनी यंत्रणेत सुधारणा न करता थेट ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महावितरणाच्या कारभाराचा अनेकदा फटका ग्राहकांना बसत असून सदोष मीटरमुळे बदलापूर, अंबरनाथ शहरांमध्ये ग्राहक त्रस्त आहेत. त्यात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरात तब्बल २० हजाराहून अधिक वीज मीटर सदोष असल्याचे नुकतेच समोर आले होते.
त्यानंतर नवे मीटर मिळावे म्हणून लाच घेतली जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे मीटरच्या संदर्भातील महावितरणाच्या चुकांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चूक महावितरणची, फटका ग्राहकाला
महावितरणाची चूक असतानाही अशा तक्र ारींमध्ये ग्राहकांनाच १८० रूपये भरून आपले सुस्थितीत असलेले मीटर तपासून घ्यावे लागते. त्यामुळे ग्राहकात संतापाचे वातावरण आहे. अशा अव्वाच्यासव्वा बिलांची संख्या शहरात मोठी असून सदोष मीटर युनिट तपासणी यंत्रणा आणि मीटरमुळे हा प्रकार होत असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनीच स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात अधिकृत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.