बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 06:51 AM2024-09-24T06:51:12+5:302024-09-24T06:51:21+5:30
सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, बदलापुरात फटाके फोडून आनंद
ठाणे : राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पाेलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
२ चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याबद्दल शिंदेविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. त्याच्या दोन पत्नींनी शिंदे याने त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या माहितीस दुजोरा दिला.
मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवणार : अक्षयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी रात्री उशिरा दिली.
अत्याचार ते एन्काउंटर; असा घडला घटनाक्रम
१२ व १३ ऑगस्ट, २०२४ : बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड
१६ ऑगस्ट : बदलापूर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला
१७ ऑगस्ट : अक्षय शिंदेला अटक
२० ऑगस्ट : बदलापूरमध्ये शाळेत तोडफोड व रेल्वे रोको आंदोलन
१९ सप्टेंबर : अक्षय शिंदेविरुद्ध कल्याण न्यायालयात आरोपपत्र
२३ सप्टेंबर : अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू. नंतर बदलापुरात फटाके फाेडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता असा घडला एन्काउंटरचा थरार...
दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी अक्षय शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडद्वारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते.
मुंब्रा बायपास येथे अक्षयने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून तीन राउंड फायर केले. यात मोरे जखमी झाले.
अचानक घडलेल्या या घटनेनंतर तो तावडीतून पळून जाऊ नये, म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडली.
या एका गाेळीतच अक्षय शिंदे याचा खात्मा झाला. कळवा महापालिका रुग्णालयात डॉक्टरांनी पुष्टी केली, असे ठाणे पाेलिस पीआरओंच्या पत्रकात नमूद आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता. त्याच्यावर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला होता. त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिस एपीआय नीलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून अक्षयवर गोळी झाडण्यात आली.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळी चालविली. त्यात आरोपीचा मृत्यू झाला. विरोधक प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करतात. तेच शिंदेला फाशी देण्याची मागणी करत होते. पोलिसांवर आरोपी गोळी चालवत असेल, तर पोलिस आपले संरक्षण करणार की नाहीत?
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. परंतु आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि त्यातून वस्तुस्थिती समोर येणे अपेक्षित आहे.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते
हलगर्जीपणा संशयास्पद; ठरवून केलेले एन्काऊंटर : विराेधकांचा हल्लाबाेल
महाराष्ट्रात पोलिस काम करतात की ‘बनाना रिपब्लिक’ सारखी स्थिती आहे कळत नाही. महिलांना सुरक्षा द्यायला सरकार तयार नाही, आरोपीला पिस्तूल मिळते कसे? निष्पाप मुलींवर अत्याचार करणारा आरोपी सरकार व गृह विभाग सांभाळू शकत नाही. हे पोलिसांनी ठरवून केलेले एन्काऊंटर आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
निष्पाप मुलींना संरक्षण दिले गेले नाही. त्या शाळेचे संस्थाचालक अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. पोलिस स्वतःची हत्यारे सांभाळू शकत नाहीत. आरोपीला कायद्याने शिक्षा देण्याच्याऐवजी त्याला मारून टाकण्याचे काम करतात. सरकारला कोणाला पाठीशी घालायचे होते? काय लपवायचे होते?
- सुषमा अंधारे, नेत्या, उद्धवसेना
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरने उपस्थित केले अनेक प्रश्न
आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलिस स्टेशनला का नेण्यात आले?
पोलिसांची रिव्हॉल्वर सहसा लॉक असते. आरोपीच्या चेहऱ्यावर काळ्या कपड्याचा मास्क होता. त्यातून त्याला पोलिसांच्या खिशाला लावलेले रिव्हॉल्वर दिसले. ते त्याने हिसकावून घेतले. त्यावेळी त्याच्या हातात बेड्या होत्या की नव्हत्या? रिव्हॉल्वर लॉक होते तर ते आरोपीला कसे उघडता आले?
पाच-सहा पोलिस गाडीत होते. एकच आरोपी होता. मग दाटीवाटीत गाडीत बसलेल्या पोलिसांवर त्यांचीच रिव्हॉल्वर हिसकावून घेत जीवघेणा हल्ला करणे आरोपीला कसे शक्य झाले?
पोलिसांनी प्रतिरोध करताना बळाचा योग्य प्रमाणात वापर केला होता का?
आरोपी अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेताना त्याच्या हातात बेड्या घातल्या होत्या का?
कुठल्याही आरोपीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्याच्या आजूबाजूला किमान चार ते पाच पोलिस असतात. अक्षय शिंदेभोवती किती पोलिस होते? त्या सगळ्यांना चकमा देऊन त्याने रिव्हॉल्वर घेतले का?
या घटनेचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी २४ तास लावले. काही पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप होत होता. त्याची आता चौकशी होणार का?
संबंधित शाळेच्या संस्थाचालकांना अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश का आले नाही?
या प्रकरणात नुकतेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार होती. आता या सुनावणीचे पुढे काय होणार?
अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये थेट आरोप केला आहे की पोलीस कस्टडीत असताना त्याला भरपूर मारहाण करण्यात आली होती. हे खरे आहे का?
बदलापूरच्या ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांना अटक झाली नव्हती. त्यांना वाचवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याच्या विराेधकांच्या आराेपाला काय उत्तर?
या घटनेमुळे पोलिसांच्या पुढील तपासाला ब्रेक लागणार आणि हे प्रकरण संपूर्णपणे शांत होणार का?