बदलापूरमध्ये पाव तीन रुपयांनी महागला, शनिवारपासून नवे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:35 AM2019-08-30T00:35:04+5:302019-08-30T00:35:09+5:30
लादीमागे मोजा १८ रुपये : खारी-टोस्ट पाच रुपयांनी वधारले
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : गरमागरम वडा, चमचमीत पावभाजी यासोबत अविभाज्य घटक असलेला पाव आता तीन रुपयांनी महागणार आहे. बदलापुरातील बेकरीचालकांनी येत्या ३१ आॅगस्टपासून पावाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला असून तूर्त १५ रुपयांना मिळणारी पावाची लादी पुढील महिन्यापासून १८ रुपये करण्यात येणार आहे, अशी माहिती बेकरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मेहमूद अब्दुल्ला गडकरी यांनी स्पष्ट केले.
बदलापुरातील बेकरीमालकांची संघटना असलेल्या कुळगाव-बदलापूर बेकरी ओनर्स वेल्फेअर असोसिएशनची अलीकडेच बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन अपयशी ठरल्यामुळे महागाई वाढत असल्याचे बेकरी ओनर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.
दरम्यान पाव, खारी, बटर, टोस्ट अशा बेकरी उत्पादनांसाठी लागणाऱ्या तेल, तूप, साखर, मैदा अशा वस्तूंच्या किमतीमध्ये तसेच भट्टीसाठी लागणाºया लाकडाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बेकरी उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय बेकरी ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.
खारी, बटर व टोस्टच्या किमतीत किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
बदलापुरात एकूण १४ बेकºया असून यामध्ये दिवसाला सहा हजारांहून अधिक लादीपाव तयार केले जातात. तीन वर्षांपूर्वी २०१६ नोव्हेंबरमध्ये पावाचे दर तीन रु पयांनी वाढवण्यात आले होते.
आज बेकरीबंद आंदोलन
वाढती महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी बदलापुरातील सर्व बेकºया बंद ठेवण्यात येणार आहेत.
बंदमध्ये सर्व बेकरीचालक सहभागी होणार असून या दिवशी बदलापूरमध्ये कोणालाही पाव आणि बेकरी उत्पादने मिळणार नाहीत.