पीडितेचे पालक म्हणतात, प्रसिद्धी नको, न्याय हवा; प्रसारमाध्यमांच्या ससेमिऱ्यामुळे नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:07 AM2024-08-24T06:07:03+5:302024-08-24T06:14:26+5:30
सततच्या कॉलमुळे आता पीडित कुटुंबीय त्रस्त झाले आहे.
बदलापूर : प्रसारमाध्यमांचा ससेमिरा मागे लागल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना त्रास जाणवत आहे. दारापर्यंत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी येत असल्यामुळे त्याचा नाहक त्रास होतो. आमचे कुटुंब तणावाखाली असल्यामुळे आम्हाला समजून घ्यावे एवढी माफक अपेक्षा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. आम्हाला प्रसिद्धी नको. आम्हाला आमच्या मुलीकरिता न्याय हवा, अशी विनंती पालकांनी केली.
चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. पीडित कुटुंबीयांचा जबाब नोंदविण्यात आला असून, या प्रकरणात ज्या पोलिसांनी हलगर्जी केली त्यांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पीडितेच्या कुटुंबीयांना सेवाभावी संस्था आणि प्रसारमाध्यमांचा त्रास होत आहे. पीडित मुलीच्या आईचा मोबाइल नंबर प्रसारमाध्यमांकडे उपलब्ध झाल्यामुळे अनेक जण फोन करून काहीतरी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सततच्या कॉलमुळे आता पीडित कुटुंबीय त्रस्त झाले आहे. आपल्या चिमुकल्या मुलीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याकरिता तिच्या कुटुंबाचा प्रयत्न आहे. आम्हाला पोलिस यंत्रणा चांगल्या पद्धतीने सहकार्य करीत आहेत, तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे आम्हाला अधिक काही बोलण्याची इच्छा नाही. आमच्या मुलीला न्याय मिळावा एवढी माफक अपेक्षा त्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.