बदलापुरात काँग्रेस सत्तेच्या केंद्रस्थानी राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:09+5:302021-09-07T04:49:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची पालिकेत एन्ट्री होईल आणि निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवकच बदलापूरचा आगामी नगराध्यक्ष ठरवतील, असा दावा काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केला.
जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दयानंद चोरघे यांनी जिल्ह्यात कार्यकर्ता संपर्क अभियान सुरू केले आहे. रविवारी चोरघे यांनी या अभियानांतर्गत बदलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसच्या आगामी काळातील वाटचालीबाबत माहिती दिली. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने आगामी पालिका निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढायचे की, स्वबळावर याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील. निवडणुकीत आघाडी असेल, तर समसमान जागावाटपाबाबत काँग्रेस आग्रही राहील. आगामी निवडणुकीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून, नागरिकांच्या विविध समस्या सोडविणे, शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे व पक्ष अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे चोरघे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र थोरात, महेश धानके, चेतनसिंह पवार, संजय जाधव, लक्ष्मण कुडव, रंजन एडवनकर, दादासाहेब पाटील, अकबर खान, असगर खान, लक्ष्मण घरत, मनोजकुमार शुक्ला, सुरेंद्र भालेराव, आस्था मांजरेकर, साधना ओव्हाळ, ज्योती पवार, सुनीता तायडे, लाटकर आदी उपस्थित होते.
-------------
नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती गणेशोत्सवापूर्वी
काँग्रेसच्या बदलापूर शहराध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असल्याचे चोरघे यांनी सांगितले. प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणे व राज्यातील जिल्हाध्यक्ष नियुक्त्या जाहीर होणे या प्रक्रिया सुरू असल्यामुळे शहराध्यक्ष नियुक्ती लांबणीवर पडली होती. मात्र शहराध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.