बदलापुरात कोरोना रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:23+5:302021-03-06T04:38:23+5:30
बदलापूर : बदलापुरात गेल्या ११ महिन्यांत १० हजार १७ कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने शहरात मृत्युदर रोखण्यात पालिका ...
बदलापूर : बदलापुरात गेल्या ११ महिन्यांत १० हजार १७ कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने शहरात मृत्युदर रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आतापर्यंत १२७ रुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबई महानगर क्षेत्रात सर्वांत कमी मृत्यू बदलापूर शहरात झाले आहेत. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत शहरात तब्बल ४१६ रुणांची नोंद झाली आहे.
गेल्यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बदलापुरात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच गेली. बुधवारी शहरात ३९ रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या १० हजार १७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२७ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातला मृत्यूदर अवघा १.२६ टक्के इतका आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाचाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. बदलापूर नगरपालिका दररोज सरासरी १०० चाचण्या करते. आतापर्यंत १९ हजार चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे बोलले जाते. शहरात संसर्ग अजूनही मोठ्या प्रमाणावर असल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी अद्ययावत ३० खाटांचा अतिदक्षता उभारणारी कुळगाव बदलापूर नगरपालिका राज्यातील पहिला नगरपालिका ठरली होती. या रुग्णालयात अद्याप एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागल्याचा परिणाम बदलापूर शहरातही पाहायला मिळतो आहे. बदलापूर शहरात गेल्या १४ दिवसांत तब्बल ४१६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात २६ फेब्रुवारीला सर्वाधिक ४१ तर २५ फेब्रुवारी आणि ३ मार्चला ३९ रुग्णांची नोंद झाली आहे.
चौकट
अंबरनाथमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात
अंबरनाथ शहरात बुधवारपर्यंत ८ हजार ८७० रुग्णांची नोंद झाली आहे तर आतापर्यंत शहरात ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेने आतापर्यंत ४३ हजार चाचण्या पूर्ण केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत चाचण्यांची संख्या मर्यादित केली होती. मात्र, आता पुन्हा चाचण्या वाढविल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.