बदलापुरात ढोल पथकाचा गोंगाट; रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:56 PM2018-11-01T23:56:14+5:302018-11-01T23:57:12+5:30
फलाट क्रमांक-३ वर पथकाने ढोल बडवत आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण केले. हा प्रकार स्थानक प्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसमोरच घडला.
बदलापूर : बदलापूररेल्वेस्थानकाचा १६२ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी भाजपा खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेत सर्व नगरसेवकांना कामाला लावले होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा व्हावा, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले होते. त्यानुसार, कार्यक्रमदेखील जंगी झाला. मात्र, उत्साहाच्या भरात ढोल पथकाकडून झालेली चूक ही आयोजक आणि ढोल पथकाच्या अंगलट आली आहे. फलाट क्रमांक-३ वर पथकाने ढोल बडवत आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण केले. हा प्रकार स्थानक प्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसमोरच घडला. त्यामुळे आयोजकांसह रेल्वे अधिकारीदेखील गोत्यात येण्याची शक्यता आहे.
बदलापूर रेल्वेस्थानकाचा वर्धापन दिन भाजपाने गुरुवारी धूमधडाक्यात साजरा केला. हा कार्यक्रम एका खासगी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी खासदार कपिल पाटील हे वांगणी येथून बदलापूरला लोकलने आले. त्यानंतर, फलाट क्रमांक-३ वर कार्यक्रमस्थळी सर्व मान्यवर आले. यावेळी रेल्वेस्थानकाचा इतिहास दर्शवणारी चित्रफीतही दाखवली. बदलापूर रेल्वेस्थानकाला स्वच्छतेत तिसरा क्रमांक मिळाल्याने स्थानक प्रबंधकांसह बदलापुरातील रेल्वे कर्मचाºयांचा सत्कार केला. मात्र, कार्यक्रमात गोंधळ झाला, तो ढोल पथकाचा.
ढोल पथकातील तरुणांनी उत्साहाच्या भरात फलाट क्रमांक-३ वरील तिकीट खिडकीसमोरच ढोल वाजवण्यास सुरुवात केली. ढोलचा आवाज एवढा जास्त होता की, या आवाजाने ध्वनिप्रदूषणांतर्गत लावलेली मर्यादाच ओलांडली. ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा असताना रेल्वेस्थानकातच तब्बल ८२ डेसिबल आवाजाची नोंद झाली. हा सर्व प्रकार ढोल पथकाकडून अनवधानाने झाला. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलासमोर हा सर्व प्रकार घडला. स्थानक प्रबंधक असो वा रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रकार घडत असताना एकानेही त्यावर आक्षेप नोंदवला नाही.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता ढोल पथकांना स्थानक परिसरात येण्यास बंदी घालण्याची गरज होती. ढोल पथकांचा आवाज वाढलेला असतानाच पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन भरधाव वेगाने गेली. त्या गाडीच्या हॉर्नचा आवाज अनेक प्रवाशांना ऐकू आला नाही. त्यामुळे काही प्रवाशांसमोर अचानक एक्स्प्रेस आल्याने ते घाबरले.
या प्रकाराचे काही सजग नागरिकांकडून चित्रीकरण केले जात असल्याचे रेल्वे अधिकाºयांच्या लक्षात येताच त्यांनी हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने लगेच ढोल पथकाला आवर घातला. मात्र, आधीच ढोल पथकाला रेल्वेस्थानक परिसरात येण्यास अटकाव न करणाºया अधिकाºयांचा बेजबाबदारपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. या ढोल पथकाचा आनंद सर्व अधिकारी आणि पोलीस बलदेखील घेत होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रम ज्या पक्षाने साजरा केला, त्या भाजपालादेखील कारवाईतून वाचवण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहे.
जबाबदारी ढकलली
या प्रकरणाची प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्याचे लक्षात येताच रेल्वेस्थानक प्रबंधकांनी ही जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाची असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली. याप्रकरणी ढोल पथकावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांनी घेतली आहे.
ढोल पथकाकडून रेल्वेस्थानकात ढोल वाजवणे, ही चूकच आहे. असे स्थानकात घडू नये. त्यासंदर्भात रेल्वे सुरक्षा बलाकडून योग्य ती कारवाई केली जाईल.
- जितेंद्र झा,
स्थानक प्रबंधक, बदलापूर