बदलापूर महोत्सव रंगणार बुधवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:03 AM2018-02-20T01:03:14+5:302018-02-20T01:03:14+5:30
शिवसेना शहर शाखा आणि शिवभक्त प्रतिष्ठान बदलापूर यांच्या वतीने २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान बदलापूर महोत्सव होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली.
बदलापूर : शिवसेना शहर शाखा आणि शिवभक्त प्रतिष्ठान बदलापूर यांच्या वतीने २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान बदलापूर महोत्सव होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली. दिग्गज मराठी कलाकारांची उपस्थिती आणि त्यांच्या कार्यक्रमांनी हा महोत्सव आणखीनच बहारदार होणार आहे. सोबत, पाच दिवस उल्हास नदीपात्रात लेझर आणि फायर शो हे यंदाच्या महोत्सवाचे खास आकर्षण असेल.
बदलापूरमध्ये चार वर्षांपासून हा महोत्सव भरत आहे. उल्हास नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या चौपाटीवर महोत्सव होतो. पाच दिवस होणाºया महोत्सवात मराठी कलाकारांचे अनेक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. २१ फेब्रुवारीला महोत्सवाची सुरुवात होईल. महाराष्ट्राची गौरवगाथा हा कार्यक्र म त्या दिवशी होईल.
२२ रोजी सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावण्यांचा आनंद बदलापूरकरांना घेता येणार आहे. तर, साधना पुणेकर यांच्या लावण्यांचा कार्यक्र म २३ फेब्रुवारीला होणार आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्र मातून अनेक कलाकार टीव्हीवर दिसतात. या कलाकारांचा कार्यक्रम २४ फेब्रुवारीला होणार आहे.
२५ फेब्रुवारीला बदलापूर महोत्सवाचा समारोप होणार असून पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या दिवशी प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर आणि सिनेकलाकार आशीष पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘बॉलिवूड नाइट’ या कार्यक्र माने बदलापूर महोत्सवाची सांगता होणार आहे.
सायंकाळी ५ ते १० पर्यंत हे कार्यक्रम होतील. महोत्सवादरम्यान विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच जत्राही भरणार आहे. या बदलापूर महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक भूक भागवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, मागील काही वर्षापासून बदलापूरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत. यामुळे विविध संस्था यानिमित्ताने कार्यक्रम करत असतात. अशा कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलावंतही शहरात हजेरी लावत आहेत.