बदलापूरमध्ये ८ तास वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:56 PM2019-06-11T23:56:47+5:302019-06-11T23:57:05+5:30

महावितरणची सेवा कोलमडली : ग्राहकांमध्ये संताप, कार्यालयाशी संपर्कच नाही

Badlapur gets 8 hours power, customers are angry | बदलापूरमध्ये ८ तास वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप

बदलापूरमध्ये ८ तास वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप

Next

बदलापूर/अंबरनाथ : सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. तासभर पाऊस पडल्याने विजेचा खोळंबा होणे ग्राह्य धरले होते. मात्र तासाभराच्या पावसामुळे बदलापूरमधील वीज आठ तास बंद ठेवण्यात आली. पुन्हा एकदा बदलापूरमधील महावितरण विभागाचा कारभार समोर आला आहे. पहिल्या पावसाचा बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली, बेलवली, वालीवली, सोनिवली, बाजारपेठ आणि बदलापूरजवळच्या ग्रामीण भागालाही याचा फटका बसला. यावेळी महावितरण कार्यालयाशी संपर्कहोत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत होती. मंगळवारीही दुरूस्तीच्या कामासाठी दोन तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित केला होता.

सोमवारी मान्सूनपूर्व पावसांच्या सरी कोसळल्या. सायंकाळी आठच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली. तासभर चाललेल्या या पावसामुळे सव्वाआठच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर नऊपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र त्यानंतरही बदलापूर पश्चिम भागातील बहुतांश भाग अंधारात होता. बदलापूर पूर्वेतील वीज पुरवठा काही मिनिटात पूर्वपदावर आला. मात्र बदलापूर पश्चिमेत वीज पुरवठा करणाऱ्या एरंजाड, बाजारपेठ आणि बारवी धरण या फिडरचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे बेलवली, मांजर्ली, सोनिवली, वालीवली, बाजारपेठ आणि पश्चिमेचा इतर भाग तसेच बारवी धरणापर्यंतचा भाग अंधारात होता.
हा खंडित झालेला वीजपुरवठा थेट मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास सुरू झाला. परंतु त्यानंतरही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे रात्रभर विजेविना नागरिकांची झोपमोड झाली.
पहाटे चारच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. तोपर्यंत तब्बल आठ तास उलटून गेले होते. मंगळवारीही दुरूस्तीसाठी तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
बदलापूरप्रमाणे अंबरनाथमध्येही विजेचा खेळ सुरूच होता. सायंकळी गेलेली वीज ही रात्री उशिरा आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही भागात रात्री १२ वाजता तर पूर्व भागात पहाटे ३ वाजता पुरवठा सुरळीत झाला. पहिल्या पावसातच महावितरणच्या विभागाच्या कामाचा दर्जा आणि नियोजन उघड झाले.

भिवंडीत झाड कोसळून गाडीचे नुकसान

शहरात सोमवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास वीज गेली. टोरन्टो कंपनीने सोमवारी दुपारी १२ वाजता दुरूस्तीसाठी शहरातील मध्यवर्ती भागातील वीज खंडित केली होती. सायंकाळी ६ वाजता आलेली वीज रात्री पावसामुळे ९ वाजता चार तासांसाठी खंडित केली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मुलांना शाळेचे कपडे व साहित्य घेणाºया पालकांचे हाल झाले. दरम्यान, जैतूनपुरा येथे झाड गाडी व दुचाकीवर कोसळल्याने नुकसान झाले. घुंघटनगरमध्ये विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्कीट होऊन धूर निघत होता.

पाणी पुरवठ्यालाही बसला फटका

खंडित वीजपुरवठयाचा फटका नागरिकांच्या झोपेसह पाणी पुरवठयालाही बसला. जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा झाला मात्र सोसायटीच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी नेण्यासाठी वीज पुरवठा नसल्याने उशिरा पाणी सोडण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांचे वेळापत्रक बिघडले.

शेणवा येथे वादळी वारे
शेणवा : शहापूर तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. शेणवा, मुसई,खैरे येथील घरांचे नुकसान झाले असून शेणवा येथील पांडुरंग वरकुटे यांनी आदिवासी सोसायटीचून घेतलेल्या कर्जातून घर उभारले होते. वादळी वाºयात त्यांच्या घरांचे पत्र्याचे छप्पर उडाले असून पावसात घरातील तांदूळ, कपडे भुजून खराब झाले. तलाठी पी. विशे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Web Title: Badlapur gets 8 hours power, customers are angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.