बदलापूरला मिळाला सिमेंट काँक्रिटचा रस्ता; काटई नाक्याहून थेट पुण्याला जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 07:46 AM2022-12-17T07:46:28+5:302022-12-17T07:46:35+5:30
वाढत्या लोकसंख्येमुळे रहदारीत वाढ होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कात्रप पेट्रोल पंप ते खरवई बाह्यवळण रस्त्याच्या भागामध्ये, काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी प्राधिकरणामार्फत विस्तारित मुंबई नगरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत तीन मार्गिका असलेल्या ३.६१ किमीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. हा संपूर्ण काँक्रीटचा आणि ३० मीटर रुंद रस्ता असल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांपासून सुटका होणार आहे.
भविष्यात मेट्रोची जोडणी देखील मिळणार असल्यामुळे सामान्य नागरिक स्थायिक होण्यासाठी बदलापूरला प्राधान्य देत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रहदारीत वाढ होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
n राज्य महामार्ग ४३ आणि राज्य महामार्ग ७६ मार्गे मुंबई पुणे जाता येत असल्याने प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.
n पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण लांबीत पर्जन्य जलवाहिन्या, पादचारी मार्ग बांधण्यात आले आहेत.
n प्रकल्पात ५ मोऱ्यांचा समावेश आहे.
प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विकास आराखड्यानुसार या रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. भविष्यात मेट्रो १४ ची या भागाशी जोडणी लक्षात घेता या रस्त्यालगत ४० एकर जागा कारशेडसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए