बदलापूर नगरपालिकेने पूरग्रस्तांना मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:08 AM2019-08-02T00:08:57+5:302019-08-02T00:09:01+5:30
विशेष सभेची मागणी : नागरिकांचे नुकसान
बदलापूर : बदलापूरमध्ये २६ व २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त नागरिकांना नगरपालिकेकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी नगरपालिकेची विशेष सभा बोलवण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
या विशेष सभेत पूरग्रस्त नागरिकांना तातडीची आर्थिक मदत करण्याबरोबरच मालमताकरात सूट देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली. पूरग्रस्त भागात नगर नियोजनात तळ मजला हा स्टील फ्लोअर करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करून सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. तोपर्यंत नकाशा मंजुरी थांबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. नैसर्गिक नाले बुजवून विकासकांनी भरणा किंवा तत्सम कामे केल्यामुळे त्यावर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागात आवश्यक ती कामे तातडीने करण्याची गरज आहे. एनडीआरए, टीडीआरएफच्या धर्तीवर नगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन यंत्रणा स्थापन करण्यात यावी.
बदलापुरातील पुरामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने पूरग्रस्त नागरिकांना २०१९-२० या वर्षासाठी मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांनी केली आहे. पुरामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे होते, असे देशमुख यांनी सांगितले.
मदतकार्याला गती
च्पुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांच्या घरातील सामानाची नासाडी झाल्याने हे वाया गेलेले सामान फेकण्याची वेळ आली आहे. ते सामान फेकण्यासाठी पालिकेने मोठी यंत्रणा कामासाठी लावली आहे. जेसीबी आणि डंपरचा मोठा ताफ ा या कामात व्यस्त आहे. तर काही सेवाभावी संस्थांनीही यंत्रणेची मदत करत पालिकेच्या कामाला हातभार लावला आहे.
च्पालिकेच्या वतीने नियमित औषध फवारणी केली जात आहे. तसेच साथीचे आजार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. सरकारी यंत्रणेपेक्षा स्थानिक राजकीय पुढारी हे चांगल्या पध्दतीने काम करत असल्याचे नागरिक सांगत आहे.