बदलापूर पालिका : २९० विषयांना दिली स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:36 AM2018-11-01T00:36:00+5:302018-11-01T00:36:11+5:30
कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही घेतली. जिल्ह्यातील नेत्यांनी यासंदर्भात नंतर निर्णय घेऊ, असे निर्देश दिल्यावर बुधवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे सर्व आर्थिक विषय स्थगित करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनीच घेतला. त्यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही आक्षेप नोंदवला नाही.
कुळगाव-बदलापूर पालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात जी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदीपेक्षा चार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आले आहे. आधीच अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींपेक्षा जास्त खर्च झालेला असतानाही अर्थसंकल्पाला बाजूला सारून कोट्यवधींची कामे करण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने अर्थसंकल्पात ज्याज्या विकासकामांसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे, त्यातील ज्या कामांवर खर्च झालेला नाही, तो खर्च सुधारित अर्थसंकल्पात वर्ग करणे शक्य आहे.
मात्र, पालिकेने वर्षभरात प्रचंड प्रमाणात कामे केल्याने यंदाच्या अर्थसंकल्पातून या कामांची बिले देणेही शक्य होणार नाही. अशी स्थिती असताना अर्थसंकल्पाला अधीन राहून नव्याने विकासकामांचा समावेश करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाकडून माहिती न घेताच विषयपत्रिका तयार झाल्याने प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विषयपत्रिका तयार झाल्यावर आता प्रशासनानेही आपली माहिती तयार केली आहे. यात संबंधित विषयांसाठी पालिकेकडे आर्थिक तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधीच्या विषयांचीच बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन विषय घेणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काय निर्णय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर, पालिकेच्या विषयपत्रिकेत आलेल्या विकासकामांना निधी नसल्याने त्यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी हस्तक्षेप करून स्थानिक नगरसेवकांना सबुरीने घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, सर्वसाधारण सभेत २९५ विषयांपैकी स्वच्छता अभियानाशी निगडित चार विषयवगळता इतर सर्व विषय तहकूब करण्यात आले.
नगरसेवक, प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव
कुळगाव-बदलापूर पालिकेत नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव या सर्वसाधारण सभेत स्पष्ट दिसत होता. प्रशासनाने निधी नसल्याची दिलेली माहिती हीच या सर्वसाधारण सभेच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे. त्यामुळे आता भविष्यात तहकूब विषयांची सभा पुन्हा घेतल्यावर त्यावर काय निर्णय होणार आणि जिल्ह्यातील नेते काय निर्णय देणार, हे दिवाळीनंतर स्पष्ट होणार आहे.