बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ पूर्णपणे बंद होणार नाही!
By पंकज पाटील | Published: February 3, 2024 06:05 PM2024-02-03T18:05:13+5:302024-02-03T18:05:26+5:30
ठाणे येथे लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे ते म्हणाले.
बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ हा बॅरिकेटींगद्वारे पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ असलेल्या हजारो रेल्वे प्रवाशांना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलासा दिला आहे. होम प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्र. १ मध्ये संपूर्ण बॅरिकेटींग लावण्याऐवजी केवळ रेल्वेचे काम सुरू असलेल्या २० मीटर जागेवर बॅरिकेटींग करण्यात येणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे.
बदलापूर पूर्वेला अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ही माहिती दिली. बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ हा बंद केल्यानंतर प्रवाशांचे हाल होणार असल्याच्या तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत कपिल पाटील यांनी शनिवारी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देत रेल्वे प्रवासी व प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मध्य रेल्वे व एमआरव्हीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. बदलापूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार असून, १२ मीटरचे दोन प्रशस्त पूल, सहा एक्सलेटर आणि तीन लिफ्ट बसविण्यात येत आहे. प्रवाशांची काही काळ गैरसोय होणार असली, तरी भविष्यातील सुविधांसाठी प्रवाशी व रेल्वे यांच्यात `सुवर्णमध्य' काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. रेल्वे स्थानकातील कामांबाबत रेल्वे प्रशासनाकडून पुढील १५ दिवस वॉक थ्रू घेऊन सुविधांबाबत चाचपणी केली जाईल. त्यानंतर २० फेब्रुवारीनंतर प्रवाशी संघटना व प्रवाशांच्या उपस्थितीत संपूर्ण कामांचे सादरीकरण केले जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे श्री. कपिल पाटील यांनी सांगितले. ठाणे येथे लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे ते म्हणाले.
लवकरच होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन
रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. खासदारकीच्या पहिल्या टर्मपासून कपिल पाटील यांनी होम प्लॅटफॉर्मसाठी पाठपुरावा केला होता. या कामातील तांत्रिक अडथळे व भूसंपादनाचा तिढा दूर करीत अखेर होम प्लॅटफॉर्म साकारला आहे.