बदलापूर अत्याचार प्रकरण: कारवाईला विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दणका; ३ जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:53 PM2024-08-20T17:53:00+5:302024-08-20T17:54:12+5:30

नागरिकांच्या दबावानंतर गृहखात्याने याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

Badlapur school Case action on Police Officers For Delaying Action 3 suspended | बदलापूर अत्याचार प्रकरण: कारवाईला विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दणका; ३ जण निलंबित

बदलापूर अत्याचार प्रकरण: कारवाईला विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दणका; ३ जण निलंबित

Badlapur School Case ( Marathi News ) : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडूनही अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याची माहिती उघड झाली. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पालकांना तब्बल १२ तास रखडवून ठेवण्यात आले आणि १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे अखेर आता नागरिकांच्या दबावानंतर गृहखात्याने याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरील या कारवाईनंतर आंदोलन करणाऱ्या नागरिकांचा रोष कमी होणार का, हे पाहावं लागेल.

एसआयटीचीही स्थापना

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांनाही त्यांनी दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १२ ते १३ ऑगस्टला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

Web Title: Badlapur school Case action on Police Officers For Delaying Action 3 suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.