Badlapur Crime: बदलापूर पुन्हा हादरले! चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये अत्याचार, चालकच बनला नराधम
By पंकज पाटील | Updated: January 22, 2026 21:56 IST2026-01-22T21:52:50+5:302026-01-22T21:56:48+5:30
Badlapur Rape Case: बदलापूर शहर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरले. एका चिमुकलीवर बसचालकानेच अत्याचार केला.

Badlapur Crime: बदलापूर पुन्हा हादरले! चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये अत्याचार, चालकच बनला नराधम
- पंकज पाटील, बदलापूर
Badlapur Crime:बदलापूर पुन्हा शालेय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरले. बदलापूर पश्चिम भागातील एका शाळेच्या स्कूल बसमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या शाळा प्रशासनाने देखील स्कूल बस चालकाची बाजू घेतल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले.
बदलापूर पश्चिम भागात नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एका चार वर्षाच्या चिमुकलीला शाळेतून घेऊन स्कूल व्हॅन चालक घरच्या दिशेने निघाला होता. या मिनीबसमध्ये इतर शाळेचे विद्यार्थीही असल्यामुळे बस पोहोचायला नेहमी उशीर लागत होता. मात्र आज दुपारी दीड वाजता येणारी बस वेळेवर न आल्याने पीडित मुलीच्या आईने स्कूल बस चालकाला फोन केल्यावर ही बस तब्बल पाऊण तास उशिराने घराजवळ आली.
मुलगी रडतच बसमधून उतरली
स्कूल बसमधून उतरल्यानंतर पीडित मुलगी रडत असल्याने तिच्या आईने तिला विचारणा केली. स्कूल बसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर चिमुकलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनांची माहिती दिली.
लागलीच पालक शाळा प्रशासनाकडे याबाबत जाब विचारण्यासाठी गेले. पीडित मुलीने घडलेला प्रकार मुख्याध्यापिकेच्या समोर सांगितल्यानंतर देखील संबंधित मुख्याध्यापिकेने पालकांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही.
चालकाला बघून मुलगी लपली
या प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यासाठी स्कूल व्हॅनच्या चालकाला शाळेत बोलावल्यावर त्या चालकाला पाहून पीडित मुलगी घाबरून आपल्या पालकांच्या मागे लपली. त्यावरूनच घडलेल्या प्रकार किती गंभीर होता याची जाणीव झाली.
शाळा प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी त्या चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महिला कर्मचारी नसल्याने घडली घटना?
स्कूल व्हॅनच्या चालकाने इतर मुलांना सोडण्यासाठी उशीर झाला त्यामुळे येण्यास विलंब झाला असे कारण पुढे केले, मात्र मुलीची अवस्था पाहिल्यानंतर पालकांना देखील काहीतरी चुकीचे घडल्याचे लक्षात आले. ज्या बस मधून ही चिमुकली प्रवास करीत होती, त्या बसमध्ये कोणतीही महिला अटेंडंट नसल्याने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बस चालकासोबत शाळा प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी बदलापूरकर करीत आहेत.