बदलापूरला लागली दृष्ट
By admin | Published: February 23, 2017 05:53 AM2017-02-23T05:53:10+5:302017-02-23T05:53:10+5:30
शहराच्या एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला उल्हास नदीचा प्रवाह अशा
बदलापूर : शहराच्या एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला उल्हास नदीचा प्रवाह अशा निसर्गाच्या कुशीत वसलेले बदलापूर शहर. आज हे शहर झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेले शहर म्हणून बदलापूरची गणना केली जात असली, तरी केंद्राच्या अहवालानंतर हे शहर आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. स्वच्छ आणि प्रदूषणविरहित अशा शहरात घराचे स्वप्न पाहून बदलापूरमध्ये राहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाट्याला निराशा आली आहे.
देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांपैकी १७ शहरे महाराष्ट्रात आहेत. या प्रदूषित शहरांच्या यादीत ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, उल्हासनगर आणि बदलापूर या तीन शहरांचा समावेश आहे. बदलापूरला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. कात्रप, शिरगाव, खरवई, जुवेली, बेलवली, वालिवली, वडवली आणि बदलापूर गाव हा परिसर निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. असे असले तरी वाढत्या नागरीकरणामुळे या शहराच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वास्तवातील बदलापूर आणि नव्याने विकसित होणाऱ्या बदलापूरचा विचार करता प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात आलेली दिसत नाही.
पर्यावरणाचा कोणताही विचार न करता शहरात विकासकामे सुरू असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावर होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून शहरीकरण होत असल्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कमी पडत आहे. वृक्षांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढल्याने आणि त्या प्रमाणात नव्या वृक्षांची जोपासना केली जात नसल्याने शहरातील तापमान आणि प्रदूषण यांच्यात वाढ होत आहे.
प्रदूषित शहरांच्या यादीत बदलापूरचे नाव आल्याने त्याचा थेट बदलापुराच्या घरखरेदीवर लागलीच परिणाम होणार नसला,
तरी भविष्यात ही स्थिती बदलली नाही, तर त्याचा विपरित परिणाम घरखरेदीवर होणार आहे. शांत आणि प्रदूषणविरहित शहरांच्या
दिशेने नागरिक येत असल्याने बदलापूरची सध्याची स्थिती बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना आखण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
वनसंपदा वाढवण्यासाठी पुढाकार हवा
शहरात नव्याने बांधकाम व्यावसायिक इमारतींचे बांधकाम करत असतील, तर त्यांना वृक्षसंवर्धनाचीही जबाबदारी सोपवण्याची गरज आता भासत आहे. शहराला लागून असलेल्या डोंगरांवर वनसंपदा वाढवण्यासाठी पालिका आणि वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तर, कारखानदारांच्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूूषण नियंत्रण मंडळासोबत पालिकेनेही योग्य कारवाई करण्याची गरज आहे.