बदलापूरला मिळणार टाटाची वीज ; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाटा पॉवरचा पुढाकार
By पंकज पाटील | Published: February 12, 2024 05:03 PM2024-02-12T17:03:41+5:302024-02-12T17:03:50+5:30
बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
बदलापूर: बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्या अनुषंगाने टाटा पॉवर कंपनीने शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले आहे.
बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज वितरण कंपनीला बदलापूर शहरात सुरळीत वीजपुरवठा करणे अवघड जात आहे. तब्बल 25 ते 30 केवी वीज अपुरी पडत असल्याने अनेक भागात नाईलाजाने भारनियमन करावे लागत होते. तसेच वीज पुरवठा करण्यासाठी स्विचिंग स्टेशन देखील अपुरे पडत असल्याने बदलापूरची वीजपुरवठा यंत्रणा कोलमडल्याचे दिसत होते. वीज वितरण कंपनी सुरळीत वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरत असताना आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून आता टाटा पॉवर कंपनीने पुढाकार घेतला आहे. टाटा पॉवरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी कात्रप परिसरातून गेले असून त्या टॉवर वरून तब्बल 250 केवी वीज घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनीला वाढीव वीज उपलब्ध करून देण्यासाठी टाटा कंपनी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहे. त्या संदर्भातला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळतात कात्रप परिसरात स्विचिंग स्टेशन टाटाच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. या स्विचिंग स्टेशनमधून बदलापूर शहराला वाढीव वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.
वाढीव वीज उपलब्ध करून देण्यासाठी बदलापूरच्या कात्रप परिसरात आरक्षित असलेला भूखंड टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करण्यात येणार आहे.
टाटा पॉवर बदलापूरला वाढीव वीज उपलब्ध करून देणार असली तरी वितरण व्यवस्था ही वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनच राबविण्यात येणार आहे. टाटा पॉवर वीज पुरवठा करणार असली तरी ग्राहकांना जे बिल दिले जाणार आहे ते वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. '' शहर वाढत असताना वीज अपुरी पडत असल्यामुळेच टाटा पावर कंपनीकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर लागलीच काम सुरू होईल. येत्या काही महिन्यात बदलापूर शहराला वाढीव वीज उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण संपुष्टात येईल. - किसन कथोरे, आमदार