वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी नेलं अन् लिंबू पाणीतून...; तरुणीवरील अत्याचार प्रकरणी मैत्रिणीसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:12 PM2024-09-07T19:12:34+5:302024-09-07T19:12:41+5:30
बदलापूरमध्ये गुगींचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Badlapur Crime : कोलकाता आरजे कार हॉस्पिटल आणि बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. ठाण्यात अत्याचाराची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात एका तरुणीला मादक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी एका मुलीसह तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार बदलापूरच्या एका गावात घडला आहे.
बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत एका मुलीसोबत अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. २२ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एका मुलीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री घडली. बदलापूरच्या शिरगाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संतोष शिवराम रुपावते (४०), शिवम संजय राजे (२३) आणि अलिस्का उर्फ भूमिका रवींद्र मेश्राम (२०) यांना अटक केली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अलिस्काने पीडितेला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले होते आणि तेथे आणखी दोन लोक आधीच उपस्थित होते. पार्टीनंतर दोघेही बेडरूममध्ये दारू पिऊ लागले. पीडिता बाहेर जाण्यासाठी उठली तेव्हा तिने बरं वाटत नसल्याची तक्रार केली. यामुळे अलिस्काने पीडितेला लिंबू पाणी प्यायला लावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या लिंबू पाण्यात काही मादक पदार्थ मिसळले होते आणि ते प्यायल्यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागली आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडली. त्यानंतर एका आरोपीने पीडितेला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही संशयितांना तत्काळ अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) आणि १२३ आणि इतर संबंधित कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्याबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करत असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.