जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे, पाणीटंचाईने बदलापूरकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:10 AM2019-10-04T02:10:59+5:302019-10-04T02:11:31+5:30

बदलापूरमध्ये पाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर झालेली नाही.

Badlapurkar suffering from water problem | जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे, पाणीटंचाईने बदलापूरकर त्रस्त

जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे, पाणीटंचाईने बदलापूरकर त्रस्त

Next

बदलापूर : बदलापूरमध्येपाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपने बदलापूरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.

गुरु वारी बदलापूर पश्चिम येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कूळगाव बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यंदा चांगला पाऊस झाला असून धरणे भरली आहेत. बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा, सानेवाडी, रमेशवाडी आदी भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखाद्या दुष्काळग्रस्त भागाप्रमाणे महिलांना कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागत आहे. तर पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह आपण हे आंदोलन केल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. पाणीटंचाईचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जांभूळ येथील फिल्टरेशन प्लांटमधून ५ एमएलडी पाणी उचलण्याचा सोपा मार्ग आहे.

२००५ च्या महापुरानंतर बॅरेज धरण वाहून गेले. त्या वेळी या प्लान्टमधून बदलापूरसाठी पाणी घेण्यात आले होते. त्यासाठी वाहिनीचीही जोडणी केलेली होती. फक्त व्हॉल्व्ह सुरू करून पाणी घ्यायचे होते, मात्र तेही करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही स्वस्थ बसणार नाही
यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांश्ी चर्चा करण्यात आली असून त्यांनी लवकरच पाणीसमस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असले तरी पाणी समस्या दूर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे.

Web Title: Badlapurkar suffering from water problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.