बदलापूरकरांची आॅनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:48 AM2017-08-11T05:48:27+5:302017-08-11T05:48:27+5:30
फोनवरून संपर्क साधत बँक खातेदारांच्या खात्यातून आॅनलाइन पैसे वळवल्याची आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याची १५ प्रकरणे एकाच दिवशी बदलापूरमध्ये घडली.
अंबरनाथ : फोनवरून संपर्क साधत बँक खातेदारांच्या खात्यातून आॅनलाइन पैसे वळवल्याची आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याची १५ प्रकरणे एकाच दिवशी बदलापूरमध्ये घडली. अंबरनाथमध्ये अशाच प्रकारे दोघांना गंडा घातला. या फसवणूक प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी बदलापूरमधील अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात आॅनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार केली. या आॅनलाइन फसवणुकीतून सरासरी अडीच लाखांहून अधिकची रक्कम लंपास केली. कार्ड ब्लॉक होऊ नये, यासाठी त्यांच्या कार्डवरील नंबर घेण्यात आले. त्यानंतर, मोबाइलवरून ओटीपी नंबर घेत त्याच्या आधारावर फसवणूक करणाºयांनी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वळवली. एकाच दिवशी तब्बल १५ नागरिकांना अशा प्रकारे फसवले आहे.
खात्यातून २५, २० हजार रुपये वळवण्यात आले आहे. अंबरनाथ, चिंचपाडा येथे राहणाºया पूनम भोळे यांच्या फोनवर एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे क्रेडिटकार्ड ब्लॉक होण्याची भीती दाखवत त्यांच्या बँक खात्यातून ५४ हजार वळवण्यात आले. असाच प्रकार अंबरनाथच्या हरीश वाच्छाणी यांच्यासोबत झाला असून त्यांची १६ हजारांची फसवणूक झाली.
यासंदर्भात उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल म्हणाले की, यासंदर्भातील फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासोबत ग्राहकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. या प्रकरणात बँकेकडून माहिती घेऊन तपास केला जाईल, असे स्पष्ट केले.