स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूरची भरारी; राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 07:20 AM2021-11-28T07:20:10+5:302021-11-28T07:20:29+5:30
Badlapur News: स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात टप्प्याटप्प्याने प्रगती करीत यंदा सुयश मिळवले आहे.
बदलापूर : स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात टप्प्याटप्प्याने प्रगती करीत यंदा सुयश मिळवले आहे.
गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ अमृत सन्मान समारोह-स्वच्छ सर्वेक्षण-२०२१’ या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत केंद्रीयमंत्री, शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय सचिव, शहरी कार्य मंत्रालय यांच्या हस्ते कचरामुक्त तारांकित शहर स्टार मानांकनात कुळगाव-बदलापूर शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन प्रदान करण्यात आले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी योगेश गोडसे, आरोग्य विभागप्रमुख तथा स्वच्छ भारत अभियान नोडल अधिकारी वैशाली देशमुख, स्वच्छ भारत अभियान सिटी-कोऑर्डिनेटर युवराज झुरंगे उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्याद्वारे देशस्तरावर दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या कार्यकाळात स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये कचरामुक्त तारांकित शहर स्पर्धेसाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापन सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून अनेक प्रयत्न केले. विद्यमान प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कचरामुक्त तारांकित शहर मानांकनासाठी घनकचरा व्यवस्थापन आणि शहार स्वच्छता यामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमांचा केलेला अंतर्भाव, नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे परिश्रम आणि नागरिक व स्वयंसेवी संस्था यांचा सकारात्मक प्रतिसाद या सर्व कामगिरीची दखल घेत कुळगाव-बदलापूर शहराला कचरामुक्त तारांकित शहर ‘थ्री स्टार’ मानांकन प्रदान करण्यात आले.