इच्छाशक्तीच्या जोरावर बद्रीनाथ, केदारनाथची वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:31 AM2018-05-12T01:31:55+5:302018-05-12T01:31:55+5:30
जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बद्रीनाथ व केदारनाथची वारी त्यांनी नुकतीच केली आहे. अवघे चार डिग्री संश सेल्सियस तापमान, कमी असलेला प्राणवायू यावरही त्यांनी मात करत इच्छाशक्तीच्या बळावर ही वारी पूर्ण केली.
निर्मला यांनी २९ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान ही वारी केली. काही प्रवास त्यांनी रेल्वेने तर उर्वरित बसने केला. बद्रीनाथ येथे बद्रीक आश्रम मंडल हे शेवटचे टोक तसेच केदारनाथपासून ११४ किलोमीटरवर दत्तांची आई अनुसया हिचे प्राचीन मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी निर्मला गेल्या होत्या. अनुसाय यांचे मंदिर समुद्र सपाटीपासून १४ हजार फूट इतके उंचावर आहे. चार डिग्री संश सेल्सियस तापमान व प्राणवायू कमी असल्याने त्यांना श्वास घेण्यास काही वेळा त्रास झाला.
बद्रीनाथ व केदारनाथला जाण्यापूर्वी निर्मला यांनी हरिद्वार, ऋषिकेश, गंगेची पूजा, आरती केली. देव प्रयाग, रूद्र प्रयाग, पंच प्रयाग केले. गोपेश्वर मंडल येथेही त्यांनी दर्शन घेतले. तेथे असलेले शिराळी गाव बशीच्या आकाराचे आहे. तसेच पंच केदार येथे उत्तराखंड सरकारने वन औषधीचे केंद्र उभारले आहे. तेथील औषधांचा त्यांनी लाभ घेतला. त्यामुळे त्यांना प्रवासाची दगदग अथवा ताण, थकवा जाणवला नाही. निर्मला यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव उदयकुमार हे देखील होते.
निर्मला यांना धार्मिक व अध्यात्मिक आवड आहे. त्यामुळे त्या संबंधातील वाचनही त्या करतात. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि जगण्याची इच्छा शक्ती या जोरावर त्यानी बद्रीनाथ व केदारनाथचा प्रवास केला आहे. सामान्य माणूस तारुण्यात हा प्रवास करू शकत नाही. मात्र निर्मला यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर जराही न डगमगता हा प्रवास केला. या प्रवासात अन्य १२ जण त्यांच्या सोबतीला होता. त्यापैकी १० जणांना त्रास होऊ लागल्याने त्यांची यात्रा पूर्णच झाली नाही. निर्मला अन्य दोन जणांच्या वयापेक्षा जास्त वयाच्या होत्या. ८३ वय असूनही त्यांनी यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेला. यापूर्वी त्यांनी रामेश्वर, तिरुपती आणि नवग्रह यात्रा केली आहे. जुलैमध्ये मदुराई व कन्याकुमारी येथे पर्यटनाला जाण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.