जादा मोबदल्याचा हव्यास ठरला ‘बॅडविन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:30 AM2019-11-03T00:30:51+5:302019-11-03T00:31:10+5:30

डोंबिवलीमध्ये गेल्या १० वर्षांपासून सोन्याचांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय करून कल्याण,

Badwin decides to pay extra for gold in thane | जादा मोबदल्याचा हव्यास ठरला ‘बॅडविन’

जादा मोबदल्याचा हव्यास ठरला ‘बॅडविन’

Next

जितेंद्र कालेकर

अल्पावधीत जादा परतावा देणारी एखाद्या भिशीची योजना असो किंवा वर्षभर काही गुंतवणूक केल्यानंतर तेराव्या महिन्याची गुंतवणूक सोनाराने करून सोने किंवा पैसे देण्याची योजना असो किंवा थेट १४ ते १८ टक्के दराने व्याजाचा परतावा देणारी योजना असो. अशा योजनांमध्ये चांगला पैसा मिळत असला तरी कालांतराने यात फसवणुकीचेच धोके अधिक असतात. त्यामुळे अशा योजनांना बळी न पडता सर्व खात्री करून अधिकृत पावतीद्वारेच सोनेखरेदी करण्याचा सल्ला ठाणे पोलिसांनी दिला आहे.

डोंबिवलीमध्ये गेल्या १० वर्षांपासून सोन्याचांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय करून कल्याण, डोंबिवलीतील ग्राहकांचा विश्वास संपादन करून ‘गुडविन ज्वेलर्स’चा व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार अकराकरण, संचालक मोहनन तसेच सचिव सचिन चौधरी, व्यवस्थापक सुब्रह्मण्यम मेनन आदींनी आपले चांगले बस्तान बसवले. जसे डोंबिवलीत केले तसेच त्यांनी ते ठाण्यातील नौपाडा आणि अंबरनाथच्या शिवाजीनगर भागातही बसवले. हाच कित्ता नवी मुंबईतील वाशी तसेच इतर भागातही गिरवला. विविध योजना तसेच भिशीमध्ये गुंंंतवणूक केल्यास जादा परताव्याचे प्रलोभन त्यांनी ग्राहकांना दाखवले. ठाण्यातील पूजा शेलार आणि त्यांच्या आई नीलिमा यांनी प्रतिमहिना १० हजार रुपये असे २४ महिन्यांमध्ये चार लाख ८० हजार रुपये याठिकाणी गुंतवले. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. शेलार यांच्यासह आता १६५ जणांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक झाली. ठाणे जिल्ह्यात हाच आकडा १० ते १५ कोटींच्या घरात गेला आहे. मुळात, सोने एकदम खरेदी करु शकत नसल्यामुळे अनेक महिला गुडविनसारख्या आमिषाला बळी पडतात. दागिने घालण्याची महिलांमध्ये असलेली हौस, भारतीय परंपरा तसेच लग्न सोहळ्यामध्ये ते परिधान करण्याची क्रेझ तसेच अनेक समाजांमध्ये लग्नात नववधूला स्त्रीधन म्हणून माहेरून सोन्याचे दागिने देण्याची पद्धत. अशा अनेक कारणांमुळे विशेषत: महिलांच्या गळ्यात अशा अनेक योजना उतरवल्या जातात. दरमहिना एक हजार रुपये प्रमाणे १२ महिन्यांचे ग्राहकांचे १२ हजार आणि तेरावा हप्ता या ज्वेलर्सचा त्यामध्ये मिळवून १३ हजारांचे सोन्याचे दागिने देण्याची एक योजना असते. वर्षाला १६ ते १७ टक्के व्याज देण्याची दुसरी एक योजनाही दाखवली जाते. गुडविनमध्येही या दोन्ही योजना सुुरु होत्या. महिलांच्या भावनांशी खेळून त्यांचा विश्वास संपादन करुन वर्षभराने दिवाळी किंवा अक्षयतृतीयासारख्या सणांच्या नावाखाली या भिशीमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले जाते. महिन्याला अगदी पाचशे रुपयांपासून ते एक लाखांपर्यंतही रकमा घेतल्या जातात. एका तोळ्यापासून सुरुवात करुन मोठ्या वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांकरिता यात गुंतवणुकीचे प्रलोभन असते. गुंतवणुकीचा, आर्थिक क्षमतेचा अंदाज घेऊन लोकांना या जाळ्यात ओढले जाते. एक वर्षाचा कालावधी देताना ‘अगदी कधीही या, पैसे किंवा दागिने दिले जातील, अशी आश्वासक उत्तरे दिली जातात. अशाच भूलथापांना बळी पडल्यामुळे गुंतवणूकदारांची हातोहात फसवणूक होते. सुरुवातीला ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक ग्राहकांना भिशीतील पैसे किंवा दागिने दिले जातात. मुदत ठेवीतील (आरडी) पैसेही दिले जातात. अशा मोठ्या व्याजाचा परतावा किंवा दागिने मिळाल्यानंतर सहज मित्रपरिवार, नातेवाइकांमध्येच या गुंतवणूकदारांकडून तोंडी प्रचार केला जातो. यात पुन्हा गिºहाईक आणणाऱ्या प्रतिनिधीलाही काही कमिशनचे प्रलोभन दाखविले जाते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांची साखळी वाढत जाते. ठाण्यातील नौपाड्यात याआधीही पाच महिन्यांपूर्वी त्रिमूर्ती ज्वेलर्सच्या संतोष शेलार यालाही अशाच फसवणुकीमध्ये नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची आठवण डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितली. यामध्ये सुमारे तीन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे हे प्रकरणही आता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. अटक झाल्यानंतर मात्र आता लोकांच्या तावडीतून सुटलो, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली होती. अनेकदा अशा गुन्ह्यांमध्ये आरोपीने जमीन किंवा स्थावर मालमत्तेमध्ये पैसे गुंतवल्यास त्याच्या मालमत्तेच्या जप्तीनंतर न्यायालयाच्या आदेशाने लोकांना पैसे परत केले जातातही. पण, याची प्रक्रिया मोठी असते, असे सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी सांगितले. यथावकाश, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अशा गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षाही होते. तोपर्यंत यातील गुंतवणूकदारांना मात्र चांगलाच मन:स्ताप सोसावा लागतो.

त्यामुळेच जादा व्याजाच्या आमिषाला बळी न पडणे हे कधीही फायद्याचे आहे. १२ महिने एक हजार गुंतवा मग १३ आणि १४ वा हप्ता आम्ही भरु, अशी प्रलोभनेही अनेकदा फसवी असण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, १४ ते १८ टक्के दराने कोणालाही व्याज देणे परवडत नाही. ते नियमाला धरुनही नाही. मग इथे का जादा व्याज दिले जाते? याची गुंतवणूकदारांनी सखोल चौकशी करणे क्रमप्राप्त आहे. सोनेखरेदी करताना ते योग्य त्या बिलासह खरेदी करावे.
बिलाशिवाय, खरेदी ही देखील नियमबाह्य आहे. कच्ची बिलेही ग्राहकांच्या माथी मारली जातात. मुळात, जीएसटी क्रमांक, दुकानाचा नोंदणी क्रमांक, दुकान मान्यता या सर्वाची बिलावर नोंद असणे आवश्यक आहे. रोखीऐवजी धनादेशाने सोन्याची खरेदी करावी. संपूर्ण शुद्ध २४ कॅरेटपासून सोन्याचे दागिने बनविले जात नाहीत. त्याला काठिण्य येण्यासाठी तांबे आणि पितळ काही प्रमाणात मिसळून २० ते २२ कॅरेटचे करुन त्यावर हॉलमार्किंगचे दागिने तयार केले जातात. अर्थात, सर्व खात्री पटल्यानंतरच कोणत्याही भूलथापांना बळी न पडता दागिन्यांची आहे त्या भावामध्ये रीतसर पावतीद्वारे खरेदी केली जावी, असा सल्ला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. जादा मोबदल्याचे आमिष दाखवून फसवणुकीची ‘बॅड-विन’ करणारे अनेक गुडविनसारखे व्यापारीही आहेत. ग्राहकांनीही याची जाणीव ठेवून मोठ्या जबाबदारीने काळजीपूर्वक आपली गुंतवणूक करणे हितावह ठरणार आहे.

माझी मुलगी सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी पैशांची तरतूद करता यावी, यासाठी खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाºया माझ्या पत्नीने गुडविनमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. येथे काम करणाºया दोन महिला सेल्समनने माझ्या पत्नीला महिना ठरावीक रक्कम गुंतवल्यास त्याबदल्यात दागिना बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. जास्तीतजास्त गुंतवणूक केल्यास बँकांपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्या आमिषाला बळी पडून महिना तीन हजार रुपये अशा पद्धतीने आतापर्यंत ४५ हजार रुपये गुडविनच्या योजनेमध्ये गुंतवले. मोठ्या अपेक्षेने गुडविनमध्ये पैसे गुंतवले. मात्र, त्यांनी आमचा अपेक्षाभंग केला. यापुढे कोणत्याच ठिकाणी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणार नाही.
- रक्षित सामंत (नाव बदलले आहे) गुडविनमधील गुंतवणूकदार

सध्या कोणतीही बँक कधीही बंद होत आहे. त्यामुळे गुंतवणूक नेमकी कशी आणि किती करायची, हाच मोठा प्रश्न आहे. गरजेच्या वेळी सोने विकून आपली आर्थिक अडचण सोडवली जाऊ शकते म्हणून सर्वसामान्य नागरिक सोनेखरेदी करतात. त्यातच सध्या सोन्याचे भाव वाढले असल्याने सोनाराकडे थोडेथोडे पैसे भरून सोनेखरेदी केले जाते. हा व्यवहार पूर्णपणे विश्वासावर अवलंबून असतो. छोट्या गुंतवणुकीतून सोनेखरेदी करणे सोपे व्हावे, या हेतूने सोनारांच्या योजनांकडे नागरिक आकर्षित होतात. मात्र, त्यात आता फसवणूक होत असल्याने नागरिक यापुढे गुंतवणूक करताना दहावेळा विचार करतील. भिशीमधील गुंतवणूक हा सोपा पर्याय आहे. बँका कर्ज मंजूर करताना कटकटी करतात. त्यापासून वाचण्यासाठी लोक भिशीत गुंतवणूक करतात. पूर्वी मीही भिशीत पैसे भरायचो, मात्र फसवणुकीच्या घटना घडत असल्याने आता बँकव इतर सुरक्षित ठिकाणीच पैशांची गुंतवणूक करीत आहे. - संतोष सोनावणे, भिवंडी


सोनं हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची सुबत्ता मोजताना त्यांच्याकडे सोनं किती आहे ? हे प्रामुख्याने बघितलं जातं. त्यामुळे सोन्याच्या बाबतीतली भिशी ही आर्थिकदृष्ट्या आणि सोनेसंचयाच्या दृष्टीनेही फायदेशीर असल्याने तिच्याकडे पारंपरिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघितलं जात होतं. मात्र जिथे ठेवींवरचा परतावा त्वरित आणि अधिक असतो तिथे सातत्यपूर्ण परताव्याची अशाश्वतीही असतेच. तरीसुद्धा अर्थकारणाचं विशेष ज्ञान नसतानाही सहजपणे गुंतवणूक करता येण्याजोगा आणि पुरेसा परतावा देणारा पर्याय म्हणून अशा योजनांकडे ग्राहक/ठेवीदार आकर्षित होतो. अर्थात, सध्याच्या काळात गुंतवणुकीचे इतर उत्तम पर्याय अव्हेरून सोनाराकडे गुंतवणूक करणं हे अविवेकी आर्थिक धोरण ठरेल इतकं नक्की !
- कौस्तुभ बांबरकर, ठाणे
 

Web Title: Badwin decides to pay extra for gold in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.