आंबिवलीनजीक बहरतेय वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:28 AM2020-06-05T00:28:49+5:302020-06-05T00:28:56+5:30
१५ हजार झाडांची केली लागवड : मोरांसह विविध पक्ष्यांचा वाढला वावर
अनिकेत घमंडी।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केडीएमसीने आंबिवली येथे वनविभागाच्या ३८ एकर जागेवर मागील वर्षी भारतीय मूळ असलेली १५ हजार झाडे लावली आहेत. सध्या ही वृक्ष चांगलीच बहरली असून, तेथे मोर व अन्य पक्षी येऊ लागले आहेत. त्याचबरोबर तेथे राबवलेला सोलर पॅनलद्वारे ठिबक सिंचनाचा प्रयोगही यशस्वी झाला आहे, अशी माहिती महापालिकेचे सचिव आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे मुख्य अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
यासंदर्भात जाधव म्हणाले, भारतीय मूळ असलेली वड, पिंपळ, कदंब, बकुळ, कडुनिंब, चिंच, आंबे, करंज, कांचन, बुछ, शिसम, कैलासपती आशा नानाविध जातींच्या झाडांची लागवड तेथे केली आहे. या झाडांना लागणारे पाणी सूर्यकिरणांद्वारे म्हणजे सोलर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिले जात आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व झाडे जगली आहेत. सोलर पॅनल चांगल्या पद्धतीने कार्यरत असून त्याची देखभाल फारशी करावी लागत नाही. सोलरवर नियंत्रित असलेले हे एकमेव अभयारण्य असून ते बघण्यासाठी विविध ठिकाणांहून वृक्षप्रेमी येत आहेत. या अभयारण्यात विविध पक्षी येत आहेत. अनेकदा मोर दिसत असल्याने पक्षितज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी ही वनराई चांगली बहरल्यानंतर सामान्य नागरिकांसाठी ती कशी खुली करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत.
दरम्यान, अशाच पद्धतीने महापालिकेने उंबर्डे भागात मानवनिर्मित जंगल उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली होती. तेथेही दाट झाडी तयार झाली असून तेथे शिरता येणार नाही, एवढे जंगल आकार घेत असल्याचे जाधव म्हणाले.
यंदा कोरोना व निसर्ग वादळामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणताही विशेष कार्यक्रम होणार नाही. मात्र, वादळामुळे महापालिका क्षेत्रात बुधवार, गुरुवारी उन्मळून पडलेल्या झाडांच्या संख्येच्या बदल्यात नवीन असंख्य झाडे लावली जातील, असे जाधव म्हणाले.