गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील ४७ आरोपींना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:20 AM2020-12-08T06:20:40+5:302020-12-08T06:21:13+5:30
Gadchinchle sadhu murder case : गडचिंचले प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून दोनशेहून अधिक जणांना संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे.
कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व वाहनचालक यांची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात एकूण ४७ आरोपींचा सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
गडचिंचले प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून दोनशेहून अधिक जणांना संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी ४७ आरोपींना जमीन मंजूर केला. गडचिंचले येथे चोर समजून १६ एप्रिलला दोन साधू कल्पवृक्ष गिरी महाराज, सुशील गिरी महाराज व त्यांचा चालक नीलेश तेलवडे यांची रात्री जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ केले, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे व एका हवालदाराला सक्तीने सेवानिवृत्ती घेण्याची आणि इतर १५ पोलीस कर्मचाऱ्यांना काही वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांनी केली होती.
दोनशे जणांवर कारवाई
या प्रकरणी दोनशेहून अधिक जणांवर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे.