दुप्पट रकमेचे आमिष, १५ लाखांची फसवणूक; श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:30 AM2023-03-31T07:30:19+5:302023-03-31T07:30:36+5:30
६७ वर्षांच्या सुनीता मोरजकर यांना कंपनीचा मालक सागर मास्टर याच्यासह तिघांनी गंडा घातल्याचे उघड झाले.
ठाणे : प्लॅटीनम ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांमध्ये दुप्पट रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ६७ वर्षांच्या सुनीता मोरजकर यांना कंपनीचा मालक सागर मास्टर याच्यासह तिघांनी गंडा घातल्याचे उघड झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.
तिरुमलाय ट्रेड व प्लॅटीनम ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीचे मालक सागर मास्टर व त्यांचा सहकारी मंगेश शेलार तसेच त्यांची सहकारी सुरेखा प्रसाद यांनी मोरजकर यांना त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास गळ घातली. गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेवर २० टक्के रक्कम अशी दहा महिन्यांत दामदुप्पट फायदा होईल, असे आमिष दाखविले. याच आमिषाला बळी पडून मोराजकर यांच्यासह त्यांची मुले, पती आणि ओळखीच्या लोकांनी १५ लाखांची रक्कम ऑक्टोबर २०२२ मध्ये गुंतवली. कंपनीने १५ फेब्रुवारी २०२३ रोजीचे धनादेश त्यांना दिले होते. त्यापैकी काही धनादेश हे वटले नाहीत. त्यानंतर त्यांनी आणि त्यांचा मुलगा विनय याने २९ मार्च २०२३ रोजी या कंपनीच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी फसवणूक उघडकीस आली.
कंपनीचे कार्यालय दोन महिन्यांपासून बंद
या कंपनीचे कार्यालय हे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती त्यांना सुरक्षा रक्षकाकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी या टोळक्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापैकी कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. अखेर मोरजकर यांनी २९ मार्च रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात सागर मास्टर याच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी हे अधिक तपास करीत आहेत.