जांगिड येथे वृद्धेचे मंगळसूत्र खेचून बाईकस्वारांचा पोबारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 06:32 PM2018-03-29T18:32:04+5:302018-03-29T18:32:30+5:30
मीरारोड येथील जांगिड सर्कल परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोन बाईक स्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
भार्इंदर - मीरारोड येथील जांगिड सर्कल परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोन बाईक स्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना सतत वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन केवळ पोकळ वल्गनाच ठरू लागल्या आहेत. भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी वृद्ध व प्रामुख्याने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढणा-यांचा सुळसूळाट वाढू लागला आहे. त्यावर पोलिसांचे नियंत्रण ढासळू लागल्याचा आरोप केला जात आहे. असाच प्रकार बुधवारी रात्री जेवण आटपून आपल्या पती सोबत ११ वाजताच्या सुमारास शतपावली करण्यासाठी जांगिड सर्कल येथून सिल्वर पार्क परिसरात गेलेल्या पूनम चव्हाण (५९) यांच्याबाबतीत घडला. या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे १ तोळा ८०० ग्रॅम वजनाचे सुमारे २२ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र त्यांच्या मागून आलेल्या बाईकस्वाराने खेचून एमटीएनएलच्या दिशेने पळ काढला. यावेळी बाईकवर दोन तरूण बसले होते. त्यातील मागे बसलेल्या तरुणाने पूनम यांच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचल्याचे पूनम यांनी सांगितले. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी असलेल्या जांगिड सर्कल येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून, त्याद्वारे चोरट्यांचा शोध लागण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेनंतर काही वेळाने न्यू म्हाडा कॉलनी परिसरातही एका वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना घडल्याचेही सांगण्यात आले असून त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी चोरट्यांचा चांगलाच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात आहे.