राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय भूमिका घेणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 01:33 PM2022-04-07T13:33:36+5:302022-04-07T13:33:56+5:30
पोलिसांनी परवानगी दिली नाही तर सभा रस्त्यावरच घ्यावी लागणार, असा इशारा मनसेने दिला आहे.
ठाणे: गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे आता मनसेच दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. नाराज असलेल्या मनसैनकांना खुद्द राज ठाकरे यांनी चर्चेला बोलावले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी या एकूणच प्रकरणावर भाष्य केले आहे.
पाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे पुन्हा एक मोठी सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या सभेसाठी मनसेने ठरवलेल्या स्थळी पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, बाळा नांदगावकर यांना वसंत मोरे यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारले.
बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले
वसंत मोरे यांच्याविषयी राज ठाकरे ९ एप्रिलच्या सभेत स्वत:च बोलणार आहेत. आता आमचे सुप्रीमो यावर बोलणार असतील आम्ही त्यावर आता काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तर पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिवतीर्थवर बोलवण्यात आलेल्या बैठकीविषयी बोलणे त्यांनी टाळले. मी ठाण्यात आलो आहे. त्यामुळे शिवतीर्थावरील बैठकीविषयी मला माहिती नाही, असे सांगत बाळा नांदगावकर यांनी याविषयावर बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. तसेच बाळा नांदगावकर यांनी ठाण्यामध्ये सभेसाठी मोकळे मैदान नसल्याने सदर सभा रस्त्यावरच घ्यावी लागणार, असा इशारा दिला आहे. रस्त्यावर परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार असेही यावेळी ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांची सभा तीन पेट्रोल पंपजवळील गजानन महाराज चौक येथे होण्याची शक्यता आहे. मनसेलाही हा पर्याय मान्य आहे. परंतु पोलीस विभाग चाचपणी करून पुढील निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी, राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोग्यांच्या भूमिकेवर मुस्लिम कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना मुंबईत बोलावले आहे. मात्र, पुण्यातील मनसेतील मोठे नाव असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावर, मला राज ठाकरेंनी बोलावले नाही. मात्र, ठाण्याच्या सभेला येण्याचा निरोप आहे. मी त्या सभेला जाणार असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.