बाळ्यामामांच्या बंडाला लाभले बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:19 AM2019-04-11T00:19:46+5:302019-04-11T00:20:10+5:30
अजित मांडके । लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून ...
अजित मांडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची शिवसेनेने तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली आहे. म्हात्रे यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्याऐवजी त्यांची थेट हकालपट्टी केल्याने भाजपची डोकेदुखी कायम राहिली आहे. याच मतदारसंघात काँग्रेसच्या सुरेश टावरे यांच्याविरोधात बंडखोरी करणारे विश्वनाथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही, तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
सुरेश म्हात्रे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावले, तर आपण आपली व्यथा त्यांच्या कानांवर घालू, असे वक्तव्य करत आपण ठाकरे यांनी विनंती केली, तर माघार घेऊ, असे संकेत दिले होते. परंतु, शिवसेनेने म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई केल्याने त्यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब केले. बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत म्हात्रे यांच्या हकालपट्टीचा निर्णय झाला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भिवंडीत कपिल पाटील व पर्यायाने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कदाचित, भिवंडीत म्हात्रे यांना माघार घ्यायला लावली, तर अगोदरच कपिल पाटील यांच्यावर नाराज असलेले शिवसैनिक अधिक नाराज होतील, असा विचार करून शिवसेना नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. भिवंडीत सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजमुळे सेनेच्या म्हात्रेंबाबतच्या भूमिकेला पुष्टी मिळाली आहे. म्हात्रे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक आता खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरणार आहे.
ठाणे आणि कल्याणपेक्षाही भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भिवंडीत भाजपने पुन्हा कपिल पाटील यांना उमेदवारी दिल्यापासून शिवसेनेत त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. पाटील यांना उमेदवारी दिली, तर आपण त्यांच्याविरोधात बंड करू, असा इशारा म्हात्रे यांनी आधीच दिला होता. म्हात्रे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू होते. परंतु, ते असफल ठरले.
भाजप व शिवसेनेत जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू होत्या, तेव्हा शिवसेनेने पालघर व भिवंडी या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला होता. पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने उमेदवारी दिलेले राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश द्यायला भाग पाडून उमेदवारी देण्यास बाध्य केले गेले. तात्पर्य हेच की, पालघर मतदारसंघ सोडताना उमेदवार भाजपने लादला. त्याचवेळी भिवंडी मतदारसंघ मात्र सोडला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाने म्हात्रे यांच्या बंडाकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार आहे. विश्वनाथ पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा, याकरिता दबाव टाकला जात आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर त्यांचीही पक्षातून हकालपट्टी निश्चित मानली जात आहे.
विश्वनाथ पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी श्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती भिवंडीचे प्रभारी सुभाष कानडे यांनी दिली. त्यामुळे सध्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील व म्हात्रे हे दोघे रिंगणार राहिले, तर पाटील हे किती प्रमाणात कुणबी मते खातात, यावर टावरे यांचे भवितव्य अवलंबून असेल, तर म्हात्रे किती प्रमाणात आगरी मते खेचतात, यावर कपिल पाटील यांचे भवितव्य ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. मेसेज व्हायरल होणे, म्हात्रे यांची बंडखोरी टिकून राहणे व शिवसैनिकांनी पाटील यांचे काम करण्यास नकार देणे, हा केवळ योगायोग असल्याचे मानण्यास भाजपचे कार्यकर्ते तयार नाहीत.
असा आहे मेसेज... गद्दारांना नेस्तनाबूत करा
दगाबाजीला अद्दल घडवून नेस्तनाबूत करणे, हे शिवरायांचे तत्त्व. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद करणे, हा शिवरायांचा दंडक. एकदा रात्री प्रत्यक्ष शिवरायांनी गडाचे दरवाजे उघडा, असा आदेश मावळ्यांना (शिवसैनिकांना) दिला. परंतु, स्वराज्याच्या मावळ्यांनी नम्रपणे नकार देत स्वराज्य दंडक पाळला, असे मावळे (शिवसैनिक) कडवे अन् प्रामाणिक होते.
२०१४ साली शिवसेनेच्या जीवावर भिवंडी लोकसभेत निवडून आलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी दगाबाजी करत शिवसेनेला ठाणे संपवण्यासाठी प्रयत्न केले. सर्व निवडणुकांत केलेला छळ शिवसैनिक कदापि विसरणार नाहीत. दगाबाजी (कपिल पाटील) नेस्तनाबूत करणे, हे शिवरायांनीच शिकवले. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करणाºया पाटील यांना शिवसैनिक नेस्तनाबूत करतील.
निवडणूक जाहीर करण्यात आली आहे (सूर्यास्त झालेला असून गडाचे दरवाजे बंद झाले आहेत.) आता शिवसैनिक स्वराज्य दंडक पाळतील (पक्षादेश धुडकावतील) भाजप खासदार कपिल पाटील यांना पराभूत करतील आणि कडवट शिवसैनिक म्हणजे काय, हे दाखवून देतील, एवढे नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र
एक सुज्ञ शिवसैनिक
पक्षाने आदेश दिलेले आहेत. त्यानुसार, भिवंडीतील प्रत्येक शिवसैनिक काम करत आहे.
- प्रकाश पाटील,
शिवसेना जिल्हाप्रमुख, ग्रामीण
सुरेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यांनी युतीच्या उमेदवाराविरोधात जाऊन बंडखोरी केलेली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे.
- एकनाथ शिंदे, शिवसेना नेते तथा पालकमंत्री, ठाणे