Video : श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड, पोलिसांनी शिवसैनिकांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 08:03 PM2022-06-26T20:03:20+5:302022-06-26T20:07:42+5:30
Eknath Shinde : कॅम्प नं-५ मधील शिवसैनिकांनी बालाजी किणीकर यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी खासदार श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना नवीन असतांना, रविवारी शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर कॅम्प नं-५ मधील शिवसैनिकांनी बालाजी किणीकर यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सुरवातीला संभ्रमात असलेले शहर शिवसैनिकांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याने, शिंदे समर्थकांची कोंडी झाली. शनिवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गोलमैदान येथील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोडकरणाऱ्या सहा शिवसैनिकवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर रविवारी मराठा सेक्शन येथील शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेवर नगरसेवक शेखर यादव यांनी भले मोठे पोस्टर्स लावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. तसेच दुपारी शेखर यादव यांच्यासह शिवसेना शाखा प्रमुख, विभागप्रमुख व शिवसैनिकांनी बाल शिवाजी जिजामाता गार्डन येथे जिजामाता व शिवाजीं महाराज यांना पुष्पहार अर्पण करून शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच गद्दार यांचे काही खरे नाही. असा सूचक इशारा शिंदे यांच्या समर्थकांना दिला.
उल्हासनगरात शिवसैनिक रस्त्यावर, बालाजी किणीकर आणि एकनाथ शिंदेंविरोधात आंदोलन pic.twitter.com/pdEaV5hOLV
— Lokmat (@lokmat) June 26, 2022
कॅम्प नं-५ कैलास कॉलनी येथे शिवसेना विभागप्रमुख आदिनाथ कोरडे, लाल्या कुंचे, राजू घडायली, भगवान भांडे यांच्यासह शाखा प्रमुख, विभाग प्रमुख व शिवसैनिकांनी एकत्र येत आमदार बालाजी किणीकर, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रविवारी दुपारी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शनिवारी शिवसैनिकांना शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा सल्ला दिला होता. मात्र संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरत असल्याने, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या होम जिल्ह्यातील उल्हासनगर मधून शिवसैनिकाकडून विरोध होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.