ठाण्यात कोरोना रुग्णांच्या १२०४ खाटा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:40 AM2020-08-18T00:40:27+5:302020-08-18T00:40:36+5:30
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्येच तब्बल ६०१, तर इतर रुग्णालयांच्या मिळून १२०४ खाटा रिकाम्या असून आयसीयूच्यादेखील १२२ खाटा शिल्लक आहेत.
अजित मांडके
ठाणे : गेल्या काही दिवसांत ठाण्यात कोरोना रुग्णदरवाढीचा वेग मंदावला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर आले आहे. यामुळे पूर्वी रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याची ओरड कमी झाली असून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्येच तब्बल ६०१, तर इतर रुग्णालयांच्या मिळून १२०४ खाटा रिकाम्या असून आयसीयूच्यादेखील १२२ खाटा शिल्लक आहेत.
रविवारपर्यंत ठाणे शहरातील २३ हजार २९५ कोरोनाच्या रुग्णांपैकी ७४५ जणांचा मृत्यू झाला असून त्यावर मात करणाऱ्यांची संख्या २० हजार ८०३, तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १७४७ एवढी आहे. रुग्ण बरे हाोण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांवर आले आहे. ठाण्यासाठी समाधानकारक बाब असून यामुळे आता शहरातील कोविड रुग्णालयातील खाटा रिकाम्या राहू लागल्या आहेत. रुग्णदरवाढीचा म्हणजेच डबलिंगचा रेटदेखील ९० दिवसांवर आला आहे.
सुरुवातीच्या म्हणजेच मे, जून, जुलैच्या २० दिवसांपर्यंत रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील होत होते. परंतु, आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णदरवाढही कमी झाली आहे. त्यामुळे विविध रुग्णालयांत १२०४ खाटा शिल्लक असल्याचे पालिकेच्या कोविड डॅशबोर्डवर दिसत आहे. यामध्ये कोविड केअर सेंटरमध्ये ६०१ खाटा शिल्लक आहेत. वास्तविक पाहता हे सेंटर सुरू केल्यानेच बाधितांचे होणारे हालदेखील थांबले आहेत. हे रुग्णालय सुरू होण्यापूर्वी खाटा मिळविण्यासाठी रुग्णंना तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु, ती तत्काळ उपलब्ध होत आहे. तसेच आयसीयूच्यादेखील १२२ खाटा शिल्लक आहेत.
>क्वारंटाइन सेंटरही होत आहेत रिकामी, ठिकठिकाणी खाटा शिल्लक
ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील, अशांना भार्इंदरपाडा आणि होरायझन स्कूलमध्ये देखरेखीखाली ठेवले जात होते. परंतु, आता येथेदेखील खाटा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. भार्इंदरपाडा ७१६ पैकी १९९ खाटा आरक्षित असून ५१७ शिल्लक आहेत. तर, होरायझन स्कूलमध्येही ११५६ पैकी ९५ खाटा आरक्षित असून तब्बल १०६१ खाटा शिल्लक असल्याची माहिती पालिकेच्या कोरोना डॅशबोर्डवर देण्यात आली आहे. याशिवाय, शहरातील काही हॉटेलमध्येही लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी व्यवस्था केली होती. त्यानुसार, येथे २२० खाटा शिल्लक आहेत. तर, मुंब्य्रातील कौसा स्टेडिअममध्ये २०० पैकी ८४ खाटा आरक्षित असून ११६ खाटा शिल्लक आहेत.