बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये मुंबई - ठाण्यातून जमा झाली १५० चित्रे
By जितेंद्र कालेकर | Published: February 6, 2020 10:19 PM2020-02-06T22:19:47+5:302020-02-06T22:26:09+5:30
ठाण्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे तसेच कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या प्रदर्शनासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये ठाणे मुंबईतून तब्बल १५० चित्रे जमा करुन ती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तीन हात नाका येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे तसेच कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. लोकार्पणााच्या निमित्ताने याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आधारित चित्रे, व्यंगचित्रे आणि शिल्पांचेही प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये ठाणे मुंबईतून तब्बल १५० चित्रे जमा करुन ती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार, मार्मिक आणि सामनाचे संपादक, शिवसेनेचे कुशल संघटक, बेडर समाजसुधारक असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचा संपूर्ण इतिहास आणि जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती देशातील तरुणांसह भावी पिढीला कायमस्वरु पी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे वैयक्तीक आणि प्रासंगिक फोटो, त्यांची गाजलेली भाषणे, पुस्तके आणि भाषणाच्या सीडीज आदींचा संग्रह याठिकाणी ठेवण्यात आला आहे. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून हे स्मारक ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारले आहे. ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
* दोन मजल्यांच्या या स्मारकारमध्ये चित्रकला, मुद्रण आणि शिल्पकलेसाठी स्वतंत्र दालनांचा समावेश आहे. व्यंगचित्रकार, चित्रकार अशा कलाकारांना आपल्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी या ठिकाणी माफक दरामध्ये ठाणे महापालिकेने स्वतंत्र कलादालनाची सुविधा केली आहे. जे. जे. स्कूल आॅफ आर्टचे प्राध्यापक तसेच चित्रकार काशीनाथ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील ‘स्वत्व’ संस्थेचे श्रीपाद भालेराव यांच्यासह १५० ते २०० चित्रकारांच्या समुहाने ३ ते ६ फेब्रुवारी २०२० या अवघ्या तीन दिवसांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १५० चित्रे मिळविली. यामध्ये चित्रकार प्रकाश बाळ जोशी, चंद्रकांत चेन्ने आणि विजयराज बोधनकर यांनी साकारलेल्या बाळासाहेबांच्या विविध चित्रांचा तसेच शिल्पकार महेश आंजर्लेकर यांच्या शिल्पांचाही यात समावेश आहे. याशिवाय, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी काढलेली बाळासाहेबांची १० व्यंगचित्रे आणि सहा आर्कचित्रेही या दालनात खास आकर्षण ठरली आहेत.
* दस्तुदखुद्ध शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जत्रा आणि मार्मिक या मासिकासाठी काढलेली दहा व्यंगचित्रेही स्मारकामध्ये ठेवण्यात आली आहेत.
* २०१२ मध्ये ठाण्यात शिवसेनाप्रमुखांची शेवटची सभा झाली. या सभेत व्यासपीठावर बाळासाहेब ज्या खुर्चीत विराजमान झाले होते, ती खूर्ची या स्मारकामध्ये त्यांची आठवण म्हणून खास तळमजल्यावरील दालनात दर्शनी भागात जतन करण्यात आली आहे.
* पहिल्या मजल्यावर ठाण्यातील स्थानिक ‘स्वत्व’ या संस्थेच्या ३० कलाकारांची १२० चित्रे असून ठाणे स्कूल आॅफ आर्ट आणि मुंबईतील रचना संसद स्कूल आॅफ आर्ट अॅन्ड क्राफ्ट येथील शिक्षकांंच्याही चित्रांचा यामध्ये समावेश आहे. पुढील आठ दिवस हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.