बाळासाहेबांचे 'ते' स्वप्न राज यांनी पूर्ण करावे, जैन धर्मगुरूंची सूचना; मंदिराला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 06:47 AM2023-01-22T06:47:53+5:302023-01-22T06:48:25+5:30

अखंड भारत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते राज ठाकरे यांनी पूर्ण करावे, अशी अपेक्षा जैन धर्मगुरूंनी राज यांच्याकडे व्यक्त केली.

Balasahebs dream should be fulfilled by Raj suggested by Jain priests A visit to the temple | बाळासाहेबांचे 'ते' स्वप्न राज यांनी पूर्ण करावे, जैन धर्मगुरूंची सूचना; मंदिराला भेट

बाळासाहेबांचे 'ते' स्वप्न राज यांनी पूर्ण करावे, जैन धर्मगुरूंची सूचना; मंदिराला भेट

googlenewsNext

ठाणे :

अखंड भारत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते राज ठाकरे यांनी पूर्ण करावे, अशी अपेक्षा जैन धर्मगुरूंनी राज यांच्याकडे व्यक्त केली. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील जैन मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज हे शनिवारी सकाळी उपस्थित होते. विशेष म्हणजे राज यांचे आगमन होताच जैन मंदिरामध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा' आणि 'आया है राजा' ही गाणी लावून तसेच फुले उधळून जैन समाजाच्या वतीने राज यांचे स्वागत करण्यात आले.

राज यांच्याकडून आमची एकच अपेक्षा आहे. ही अपेक्षा छोटी नाहीतर खूप मोठी आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करावे. अर्धा काश्मीर आपल्या ताब्यात आहे. आम्हाला पूर्ण काश्मीर हवा आहे. त्याचबरोबर पाकिस्तानही हवा आहे. अखंड भारत हे बाळासाहेब यांचे स्वप्न तुम्ही पूर्ण करावे या अपेक्षेने आम्ही तुमचे स्वागत केले आहे, असे जैन धर्मगुरू आचार्य चितानंद महाराज यांनी सांगितले. टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा आनंदमठ आहे. मधल्या काळात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात यावरून वाद झाला होता. येथून आता बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कामकाज चालते. ठाण्याच्या राजकारणात टेंभीनाका परिसराला मोठं राजकीय महत्त्व आहे. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या भागात समाजाचे मोठे मंदिर आहे. राज यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व आरती केली. त्यानंतर ते मंदिरामधील सभा मंडपातील कार्यक्रमस्थळी आले. तिथे मराठी गाणी लावून तसेच फुले उधळून राज यांचे स्वागत करण्यात आले.
 

Web Title: Balasahebs dream should be fulfilled by Raj suggested by Jain priests A visit to the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.