बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ‘मिशन ९०’ राष्ट्रवादीच्या मुळावर

By अजित मांडके | Published: February 13, 2023 07:41 AM2023-02-13T07:41:29+5:302023-02-13T07:41:59+5:30

ठाणे महापालिकेत मागील वेळी शिवसेनेचे ६७ नगरसेवक होते. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडे अवघे तीन नगरसेवक गेले, तर बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे ६४ नगरसेवकांचे संख्याबळ आले.

Balasaheb's Shiv Sena's 'Mission 90' based on NCP by Eknath Shinde | बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ‘मिशन ९०’ राष्ट्रवादीच्या मुळावर

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ‘मिशन ९०’ राष्ट्रवादीच्या मुळावर

googlenewsNext

अजित मांडके

ठाणे महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी म्हणजे साधारणपणे वर्षभरापूर्वी शिवसेनेने ठाण्यात ‘मिशन ९०’ राबविण्याचे जाहीर केले होते; परंतु मधल्या काळात शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने ‘मिशन’ संपुष्टात आल्याचे वाटत होते; परंतु पुन्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्याच मिशनच्या दृष्टीने आगेकूच सुरू केली आहे. मविआ सरकार असताना भाजपला खिंडार पाडून हे मिशन पूर्ण करण्याचे शिवसेनेचे मनसुबे होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडायचे आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. येत्या काळात राष्ट्रवादी पूर्णपणे फोडून बाळासाहेबांची शिवसेना ‘मिशन ९०’ पूर्ण करू शकणार का, याबाबत औत्सुक्य आहे. 

ठाणे महापालिकेत मागील वेळी शिवसेनेचे ६७ नगरसेवक होते. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडे अवघे तीन नगरसेवक गेले, तर बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे ६४ नगरसेवकांचे संख्याबळ आले. आता शिंदे यांनी मिशन ९० जाहीर करून साऱ्यांनाच धक्का दिला. कळवा पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेस श्रेयवादाची लढाई सुरू झाली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. येथूनच राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मुंब्य्रात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर घडलेल्या घटनेनंतर आव्हाड-शिंदे मैत्रीत मिठाचा खडा पडला. मागील कित्येक वर्षे राष्ट्रवादीत असलेले हणमंत जगदाळे यांनी तीन सहकाऱ्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. दुसऱ्या टप्प्यात मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हाडांवर दुसरा प्रहार करण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीचे २० हून अधिक नगरसेवक गळाला लावण्याची योजना आहे.

आव्हाडांशी दुश्मनी कायम ठेवणार !
आव्हाडांबरोबरची दुश्मनी शेवटपर्यंत निभावण्याचा निर्णय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या जवळचे मानले जाणारे नजीब मुल्ला यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास खाडीच्या आड म्हणजे ठाण्यातून राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणार आहे. तसेच आव्हाडांच्या कळवा-मुंब्य्रातील साम्राज्याला सुरुंग लावण्याची तयारी केली जात आहे. 

यापूर्वीदेखील राष्ट्रवादीला ठाण्यातून हद्दपार करण्याचा प्रयत्न झाला होता. गणेश नाईक, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे आदी दिग्गजांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी अन्य पक्षाची कास धरली. त्यानंतरही ठाण्यात राष्ट्रवादी तग धरून राहिली. राष्ट्रवादीला संपवत असतानाच उरल्यासुरल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावून आपल्या कळपात घेण्याचे प्रयत्न आहेत.

Web Title: Balasaheb's Shiv Sena's 'Mission 90' based on NCP by Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.