बालनाट्य महोत्सवाचाही ठाण्यात फ्लॉप शो, महापौरांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:01 AM2018-12-25T03:01:41+5:302018-12-25T03:01:53+5:30
पंडित राम मराठे संगीत महोत्सवाला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याची घटना ताजी असतानाच सोमवारपासून सुरू झालेल्या बालनाट्य महोत्सवाचीसुद्धा तीच अवस्था झाल्याचे बघावयास मिळाले.
ठाणे : पंडित राम मराठे संगीत महोत्सवाला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याची घटना ताजी असतानाच सोमवारपासून सुरू झालेल्या बालनाट्य महोत्सवाचीसुद्धा तीच अवस्था झाल्याचे बघावयास मिळाले. पहिल्याच दिवशी अवघे २५ ते ३० प्रेक्षक या महोत्सवाला लाभले. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह क्रीडा, सांस्कृतिक सभापतींनीही पाठ फिरवली. परिणामी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या समारोहाचा शुभारंभ झाला. परंतु, प्रेक्षकांची संख्या पाहून त्यांनीही खंत व्यक्त केली.
मागील आठवड्यात गडकरी रंगायतन येथे पंडित राम मराठे संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकाही प्रेक्षकाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे ठाणेकरांची रसिकता कमी झाली का, असा सवाल उपस्थित झाला होता. आता सोमवारपासून बालनाट्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पूर्वी हा महोत्सव चार ते पाच दिवस रंगत होता. यंदा मात्र दोनच दिवस आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी सहा, तर सोमवारी चार बालनाट्ये सादर झाली. शुभारंभाच्या वेळेस प्रेक्षकांची संख्या २५ ते ३० च्या आसपासच दिसून आली. त्यामुळे महापालिकेचे क्रीडा आणि सांस्कृतिक सभापती दीपक वेतकरांनीही दांडी मारली. त्यामुळे या महोत्सवाचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला. परंतु, त्यांनीदेखील प्रेक्षकांची संख्या पाहून खंत व्यक्त केली. परंतु, तो साजरा करायचा असल्याने त्यांनी नाइलाजास्तव शुभेच्छाही देऊन येथून काढता पाय घेतला.
मागील काही वर्षे या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत होता. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक या महोत्सवाचे पास मागून घेत होते. परंतु, यंदा मात्र नगरसेवकांनीही निरुत्साह दाखवल्याने त्याचा फटका या महोत्सवाला बसला. कोपरीतील एक नगरसेवक जे प्रत्येक वर्षी २०० ते २५० मुले या महोत्सवाला घेऊन येत होते, ते आता नगरसेवक नसल्याने त्यांनी यातून काढता पाय घेतला. त्यात महापालिकेच्या बिघडलेल्या नियोजनामुळेसुद्धा त्याचाही फटका बसल्याचे दिसून आले. त्यात यंदापासून क्रीडा विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन केल्याने
त्यांना या महोत्सवाबाबत जनजागृती करता आली नसल्याचे यातून स्पष्ट झाले.
कार्यक्र माच्या निमंत्रणपत्रिकेमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर मीनाक्षी शिंदे, राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, खासदार, आमदार आणि सर्व विशेष समिती सभापतींची नावे टाकली आहेत. मात्र, महापौरवगळता एकाही मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावली नाही. यंदाच्या महोत्सवाला सात ते आठ लाखांचा निधी दिला आहे.
दोन तास उशिरा सुरू झाला कार्यक्र म : महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ वाजता करण्यात येणार होते. मात्र, ९ चा नियोजित असलेला कार्यक्रम तब्बल ११ ते सव्वाअकराच्या दरम्यान सुरू झाला. ११ च्या दरम्यान महापौरांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. खाजगी शाळांच्या २५ ते ३० मुलांची उपस्थिती होती.