बाल्कनी कोसळून वृद्धा झाली जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 02:16 AM2018-06-17T02:16:43+5:302018-06-17T02:16:43+5:30
पश्चिमेकडील राव तलावाशेजारी असलेल्या मेंडिस हाउस या सुमारे ३५ वर्षे जुन्या असलेल्या तीन मजली इमारतीची बाल्कनी कोसळून एक वृद्धा गंभीर जखमी झाली.
भार्इंदर : पश्चिमेकडील राव तलावाशेजारी असलेल्या मेंडिस हाउस या सुमारे ३५ वर्षे जुन्या असलेल्या तीन मजली इमारतीची बाल्कनी कोसळून एक वृद्धा गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता घडली.
ही इमारत धोकादायक ठरल्यामुळे तिची अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यातील सहा सदनिकांमध्ये रहिवासी राहत होते. तर, तळ मजल्यावर तीन दुकाने सुरू होती. सकाळी मेरी जोसेफ (७०) या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी उभ्या असताना अचानक बाल्कनीचा भाग कोसळला. त्यामुळे तोल जाऊन मेरी या खाली कोसळल्या. त्यात त्या जखमी झाल्या.
घटनेचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मेरी यांना जोशी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
उजव्या पायाच्या बोटांवर उपचार केले असून डाव्या बाजूच्या खांद्याकडील हाड मोडल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढून इमारत रिकामी केली.
तसेच पालिका अधिकारी घटनास्थळी गेले. ही इमारत तोडण्याबाबत त्यांनी आदेश दिले.
>नगरसेवक नॉट रिचेबल
प्रभाग-७ मध्ये ही दुर्घटना घडली. येथील नगरसेवक अॅड. रवी व्यास, मोरस रॉड्रिक्स, दीपाली मोकाशी, रक्षा भोपतानी हे नॉट रिचेबल होते. मात्र, नगरसेविका भोपतानी यांचे पती सतीश यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
तर, माजी नगरसेवक स्टीवन मेंडोन्सा यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अपघातग्रस्त इमारतीतील रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्याची मागणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे केली आहे.