गोष्टरंगात रंगले ठाण्याचे बालगोपाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 03:02 AM2019-10-22T03:02:28+5:302019-10-22T03:03:02+5:30
वंचितांचा रंगमंचच्या कलाकारांनीही घेतला आस्वाद
ठाणे: गोष्टरंगात रंगण्याचा मनमुराद आनंद ठाण्यातील बालगोपाळांनी घेतला. यावेळी ‘मालाचे चांदीचे पैंजण’, ‘कोरिका नावाचा पतंग’ आणि ‘मूल साऱ्या गावाचं’ या वेगवेगळ्या प्रांतांतील, देशांतील गोष्टींत क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) या संस्थेच्या कलाकारांनी मुलांना हसतखेळत ठेवले.
विशेष म्हणजे त्या गोष्टीत त्यांना सामील करून घेतलेच, परंतु त्यांच्या त्या मनापर्यंत पोहोचवण्याचे कार्यदेखील त्यांनी केले. पालक-शिक्षकांसोबत वंचितांचा रंगमंचच्या कलाकारांनीदेखील या कार्यक्र माचा आस्वाद घेतला. क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) या संस्थेचा गोष्टरंग हा नावीन्यपूर्ण उपक्र म ठाणे येथील सहयोग मंदिरात शुक्रवारी धमाल प्रतिसादात पार पडला.
वाडा तालुक्यातील सोनाळा गावात या संस्थेचे काम चालू आहे. आदिवासीबहुल अशा या भागातील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून मुलांच्या इयत्तांनुसार गोष्टींची पुस्तके शोधून त्यातील गोष्ट नाटकरूपात मुलांसमोर सादर केली जाते. मुलांसमोर गोष्ट सादर झाल्यावर ती गोष्ट ज्या पुस्तकातील आहे, ती पुस्तके दाखवली जातात. गोष्ट सादर करायच्या आधी आणि नंतर त्या गोष्टीसंदर्भात छोट्याशा अॅक्टिव्हिटीज घेतल्या जातात.
मुलांना हे सगळे आवडल्यामुळे ती आपोआप पुस्तकांकडे वळतात. मुलांना वाचनाची गोडी लागणे आणि ती नंतर लिहिती होणे, ही उद्दिष्टं समोर ठेवून गेली पाच वर्षे हा उपक्र म चालू आहे आणि त्याचा परिणाम अतिशय चांगला होतो आहे, असा अनुभव संस्थेच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात कथन केला.
शहरातील मुलांनाही अशा पद्धतीने वाचनाची गोडी लागावी म्हणून हे प्रयोग आता शहरातही केले जातात. गोष्टरंगच्या नाटुकल्यांचे दिग्दर्शन गीतांजली कुलकर्णी यांनी केले असून संगीत शंतनू हेर्लेकर यांचं, नेपथ्य पायल पाटील यांचे आहे. प्रतीक्षा कचरे, राम साईदपुरे, महेंद्र वाळुंज, वर्धन देशपांडे, ऋग्वेद सोमण या पाच कलाकारांची टीम यात आहे.