बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:40 AM2021-03-19T04:40:00+5:302021-03-19T04:40:00+5:30
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर मार्गांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बाळकुम ते गायमुख खाडीकिनारा मार्ग प्रकल्पाच्या आराखड्याचे ...
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर मार्गांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बाळकुम ते गायमुख खाडीकिनारा मार्ग प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण पालिका प्रशासनाने गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांना केले. याशिवाय, कळव्यातील आत्माराम चौक ते खारेगाव बाह्यवळण मार्ग बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी प्रकल्पामध्ये मोघरपाडा भागातील खारफुटी बाधित होणार असून ती कमीत कमी कशी बाधित होईल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच गायमुख भागात मुख्य मार्गाला खाडीकिनारी मार्गिका जोडण्यात येणार असून यामुळे या मार्गिकेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी ग्रेड सेपरेटर उभारल्यास ही समस्या सुटू शकते, असा दावा करत राजीव यांनी त्याचा आराखड्यात समावेश करण्याची सूचना पालिकेला केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च काहीसा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच कळवा भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या कळव्यातील आत्माराम चौक ते खारेगाव बाह्यवळण मार्गाचेही यावेळी सादरीकरण करून त्यावर सविस्तर चर्चा केली. याशिवाय, मुंब्रा ते शीळ मार्गाच्या रुंदीकरण कामात बाधित होणारी बांधकामे हटविण्याबाबत आणि मुंब्रा परिसरात पर्यायी मार्गिका उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
चौकट -
म्हापे ते काटई रोड, घोडंबदरचा बाळकुम ते गायमुख आणि कळवा आत्माराम चौक या रस्त्यांच्या भूसंपादनाबरोबर, पर्यावरणाच्या दृष्टीने ज्या परवानग्या घेणे गरजेचे आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना राजीव यांनी महापालिकेला दिल्या.
प्रकल्पांचा एकूण खर्च
बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी मार्ग प्रकल्प - १२०० कोटी
कळवा आत्माराम चौक ते खारेगाव बाह्यवळण मार्ग - ३०० कोटी
कळवा तिसरा पुलाची नवीन मार्गिका - १६१.१२ कोटी
.............
वाचली