टाकाऊ, दुर्लक्षित जागेवर साकरले फुलपाखरु उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 07:14 PM2019-02-05T19:14:43+5:302019-02-05T19:16:09+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून येथील परबवाडी भागात फुलपाखरु उद्यान साकारण्यात आले आहे. येत्या ८ फेब्रुवारी पासून ते सर्वांसाठी खुले होणार आहे.
ठाणे - ठाण्यातील परबवाडी येथे टाकाऊ आणि दुर्लक्षित राहिलेल्या जागेवर आता फुलपाखरु उद्यानाने आकार घेतला आहे. त्यानुसार या उद्यानाचे लोकापर्ण शुक्रवारी होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकापर्ण करण्यात येणार असून या उद्यानाची संकल्पना सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आखली होती.
फुलपाखरु उदयानाच्या जवळ जवळ १७०० चौ.मीटरच्या जागी यापुर्वी मोठया प्रमाणात कचरा, डेब्रीज व टाकावू वस्तू टाकून तेथे रॅबिटचे डोंगर तयार झाले होते. त्यामुळे या विभागात दुर्गंधी, डास याचा प्रादूर्भाव वाढला होता. तसेच या भागात काही ठिकाणी अतिक्र मण होऊन झोपडयाही बांधण्यात आल्या होत्या. पावसाळयात पाणी साचून तेथे मच्छरांची मोठया प्रमाणात पैदास होत होती. अशा ठिकाणी वारंवार साफसफाई करु न सुध्दा तोच प्रकार घडत होता. त्यामुळे यावर उपाय काढताना विचार आला की, या ठिकाणी मोठी झाडे आहेत एक गार्डन तयार करण्याची संकल्पना पुढे आली होती. परंतु सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक नरेश म्हस्के यांनी इंटरनेटवर सर्च केले असता, त्यांच्या डोक्यात ही फुलपाखरु उद्यानाची संकल्पना आली. या संकल्पनेतून सुंदर, सुशोभित व फुलपाखरांना आकर्षित करेल अशा विविध प्रकारची झाडे लावून फुलपाखरु उदयान बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या उदयानात पेंटास, करवंदा, लॅण्टना येलो, लॅण्टना हळदीकूंकूम, लॅण्टना लॅव्हंडर अॅण्ड व्हाईट, पावडर पफ, फॅमिलिया, क्युफिया, इक्सोरा, पिंक, रेड ही झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमुळे फुलपाखरं आकर्षित होत असून, सकाळच्या वेळी मोठया प्रमाणात फुलपाखरांचे थवेच्याथवे या उदयानात येत आहेत. तसेच रॅफिज पाम ही झाडे लावण्यात आली असून, या झाडांमध्ये फुलपाखरे लपून बसत आहेत. या आगळया-वेगळया उदयानामध्ये नागरीकांना फिरण्यासाठी पायवाट, पदपथ, लॉन, हिरवळ, हॅगिंग ब्रीज तसेच पिंक, आॅरेंज, व्हाईट, रेड, पर्पल, ब्ल्यू, यलो अशा विविध प्रकारच्या कमळांसाठी पाण्याचे पॉट तयार करण्यात आले आहेत. तसेच नागरीकांना बसण्यासाठी गजीबो तयार करु न विविध सुविधा या उदयानात उपलब्ध करण्यात आलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.