पालिकेकडून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या दुकानांना बंबगाड्यांचे संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 05:37 PM2017-10-18T17:37:01+5:302017-10-18T17:37:17+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या दिवाळीत रस्त्यावरील फटाक्यांच्या दुकानांना बंदी घातली असून ते मैदाने किंवा मोकळ्या जागांत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या दिवाळीत रस्त्यावरील फटाक्यांच्या दुकानांना बंदी घातली असून ते मैदाने किंवा मोकळ्या जागांत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीची जोखीम कमी झाली असली तरी यंदा मोठ्या लोकवस्तींमधील तीनपेक्षा अधिक फटाके विक्रीच्या दुकानांना थेट बंबगाड्यांचेच संरक्षण देण्यात आले आहे.
पालिकेने गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही थेट रस्त्यावरील फटाके विक्रीला बंद घातली असून, भारतीय स्फोटक पदार्थ कायदा १८८४ मधील तरतुदीनुसार केवळ खुल्या वा मोकळ्या खासगी जागा अथवा पालिका मैदानांत ती दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी अनिवार्य करण्यात आली असून, पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार अग्निशमन विभागाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी केलेल्या पाहणीत पालिकेच्या ताब्यातील एकुण ६ तर १३ खाजगी मैदाने फटाके विक्रीसाठी निश्चित करण्यात आली. त्यांत सुमारे १०० हून अधिक फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. यातील बहुतांशी जागा मोठ्या लोकवस्तींच्या ठिकाणी असल्याने तेथील फटाके विक्रीच्या दुकानांमुळे संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आयुक्तांनी तीनपेक्षा अधिक फटाके विक्रीच्या दुकानांलगत थेट बंबगाड्या बुधवापासुन तैनात करण्याचे निर्देश अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांना दिले. त्यानुसार तीनपेक्षा अधिक फटाके विक्रीच्या दुकानांना बुधवारपासुन दिवाळी सण संपेपर्यंत बंबगाड्यांचे संरक्षण पुरविण्यात आले आहे.
याबाबत पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले की, फटाके विक्रेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करुन निश्चित ठिकाणांखेरीज इतर मोकळ्या जागेत अथवा दुकानात तसेच रस्त्यावर फटाके विक्रीचा व्यवसाय केल्यास त्या व्यावसायिकाविरोधात फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. तसेच फटाके व्यावसायिकांना आगीसारख्या घटना टाळण्यासाठी अग्निरोधक यंत्रणा फटाके विक्रीच्या ठिकाणी बसविण्याचे निर्देशही देण्यात आले असले तरी मोठी घटना घडल्यास त्यावर वेळेत नियंत्रण आणण्यासाठीच बबगाड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.