बंदा रुपया ठरतोय टीएमटीची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:07 AM2018-09-22T03:07:43+5:302018-09-22T03:07:47+5:30
बंदा रुपया खणखण वाजतो. परंतु, हाच बंदा रुपया अर्थात नाणी टीएमटी अर्थात ठाणे परिवहनसेवेची डोकेदुखी ठरू लागली आहे.
ठाणे : बंदा रुपया खणखण वाजतो. परंतु, हाच बंदा रुपया अर्थात नाणी टीएमटी अर्थात ठाणे परिवहनसेवेची डोकेदुखी ठरू लागली आहे. यामुळे टीएमटीतून प्रवास करताय, मग सावधान. कारण, तुमच्याजवळ असलेले सुटे पैसे कदाचित यापुढे ठाणे परिवहनसेवा स्वीकारणार नाही. कारण, परिवहनकडे मागील सुमारे तीन वर्षांत जमा झालेली पावणेदोन कोटींची नाणी बँकेने घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आधीच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या परिवहनसेवेपुढे या नाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता ती वटवण्यासाठी टीएमटी प्रशासन शहरातील दुकानदारांपर्यंत जाण्याचा विचार करत आहे.
परिवहनसेवेच्या ताफ्यात ३५० च्या आसपास बस आहेत. त्यातील सुमारे २५० च्या आसपास बस या रस्त्यावर धावत आहेत. त्यामधून रोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांकडून रोज ३० लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. त्यात, रोजच्यारोज सुमारे ३० हजारांची नाणी येत आहेत. परिवहनचे तिकीटसुद्धा पाच, आठ, १०, ११, १३, २१ रुपये असे आहे. त्यामुळे प्रवाशांकडून सुटे पैसे मागण्याखेरीज वाहकाला दुसरा पर्याय नसतो. परंतु, आता हेच सुटे पैसे घेणे परिवहनसेवेच्या चांगलेच अंगलट आले आहे. परिवहनकडे मागील तीन वर्षांत या सुट्या नाण्यांतून तब्बल पावणेदोन कोटींच्या वर रक्कम जमा झाली आहे. ती युनियन बँकेत जमा आहे. परंतु, आता याच बँकेने त्यांच्याकडे क्षमता नसल्याने ही नाणी परत घ्यावीत, असे परिवहन प्रशासनाला सांगितले आहे. त्यामुळे एवढ्या नाण्यांचे करायचे काय, ती कुठे ठेवायची, वटवायची कुठे, असा पेच परिवहनला सतावू लागला आहे. आधीच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्पन्न वाढत नसल्याने ताफ्यातील १५० बसची दुरुस्ती करून त्या खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात, आता नव्याने या नाण्यांची समस्या निर्माण झाल्याने परिवहनपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
>बेस्ट घेणार ७० लाख
यातून मार्ग काढण्याचे आश्वासन परिवहनने बँकेला दिले आहे. तसेच बँकेनेसुद्धा यात काही मदत करावी, अशी मागणी परिवहन प्रशासनाने केली आहे. शिवाय, बेस्ट प्रशासनाला साकडे घातले असून त्यांनी ६० ते ७० लाखांची नाणी घेण्याचे मान्य केले आहे. परंतु, यामध्ये १० रुपयांची नाणी घेण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे १० रुपयांची नाणी आणि उर्वरित शिल्लक राहत असलेली इतर नाणी चलनात कशी आणायची, यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. यासाठी शहरातील दुकानदार, पतपेढ्या आदींसह इतर व्यावसायिकांपर्यंत जाऊन ही नाणी चलनात आणण्याचा विचार परिवहनने सुरूकेला आहे.
>पावणेदोन कोटींची नाणी बँकेने परत घेण्यास सांगितले आहे, हे वास्तव आहे. परंतु, ही नाणी चलनात आणण्यासाठी बेस्ट आणि इतर माध्यमांना आम्ही आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही समस्या सुटेल, असा विश्वास वाटत आहे.
- संदीप माळवी, व्यवस्थापक, परिवहनसेवा, ठाणे