उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा, मनसेची मागणी
By सदानंद नाईक | Published: December 2, 2022 06:50 PM2022-12-02T18:50:05+5:302022-12-02T18:50:42+5:30
अवजड वाहनांनी रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांसह शालेय मुलांनाही बसत आहे.
उल्हासनगर : शहरातील अरुंद रस्ते बघता दिवसा गर्दीच्या वेळी अवजड वाहनाला प्रवेशबंदी करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस वाहतूक विभागाला केली. अवजड वाहनांनी रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांसह शालेय मुलांनाही बसत आहे.
उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यांच्या कडेला उभ्या केलेल्या चार चाकी वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसेचे शिष्टमंडळाने शहर वाहतूक शाखेकडे केली. शहर हद्दीत वाहतूक पोलीस विभागाने ठरवून दिलेल्या वेळेतच अवजड वाहनांनी वाहतूक करणे बंधनकारक असतांनाही, सर्वच नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. अवजड आणि ओव्हरलोड पद्धतीने शहरातील रस्त्यांवर बेकायदेशीर आणि धोकादायक वाहतूक सुरू आहे.
रहदारीच्या वेळेस या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांनी बेकायदेशीरपणे शहरात प्रवेश करीत असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. तसेच रस्त्यांची चाळन झालेली आहे, यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून कायदा मोडणाऱ्या आणि ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली. तसेच शांतीनगरसह इतर परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा विक्री करण्यासाठी उभ्या असलेल्या आणि वाहतुकीला अडथळा करणाऱ्या जुन्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने केली. येणाऱ्या आठवड्यात शहर वाहतूक शाखेकडून कारवाई न झाल्यास मनसे आंदोलन छेडनार, असा इशारा शहर शाखेच्या वतीने वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात यांनी दिला. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष यांच्यासह शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी, विभाग अध्यक्ष कैलास वाघ,बादशहा शेख, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, अध्यक्ष मधुकर बागुल,वाहतूक सेनेचे उप शहर अध्यक्ष राहुल वाकेकर,विभाग अध्यक्ष महेश साबळे,शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर,रवी बागुल,नरेश गायकवाड तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.