शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:59 AM2024-05-17T05:59:50+5:302024-05-17T06:00:33+5:30
ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात १४४ (२) अंतर्गत आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. १५ ते १९ मे दरम्यान कुठेही फिरकू नका, असे सांगितले जात आहे. ज्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशांनाही नोटीस बजावण्याचे कारण काय, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केला.
ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु, त्या आधीच शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटीस बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ज्यांच्यावर हत्या, मोक्कासारखे आरोप आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ज्या व्यक्तीवर एकही गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींना नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही आव्हाड म्हणाले. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की, निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात. त्यामुळेच त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आल्या. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीस बजावलेल्या नाहीत. विरोधकांना लक्ष्य करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाही, याकरिता प्रयत्न असून पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचेही आव्हाड म्हणाले.
ज्याला नोटीस बजावण्यात आली, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. गर्दीमुळे अगोदरच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे सात तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आले. मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे तर मग रोड शो कशाला हवा, असा सवालही आव्हाड यांनी केला.