लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी
By सुरेश लोखंडे | Published: September 13, 2022 10:13 PM2022-09-13T22:13:13+5:302022-09-13T22:14:17+5:30
जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
ठाणे : जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याक्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील गो-जातीय गुरे व म्हशी आणि अन्य कोणतीही जनावरे कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा व प्रदर्शन आयोजित करणे आदी कोणताही कार्यक्रम करण्यास आता जिल्ह्यात मनाई आहे.
जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यात या रोगाची साथ पसरली असून बाधीत क्षेत्राच्या पाच किमी परिघातील पाच हजार १७ पशुधनास आजपर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरीत बाधीत पशुधनावर उपचार सुरू आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याप्रमाणेच ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
नियंत्रित क्षेत्रातील व त्या क्षेत्राबाहेरील गो-जातीय गुरे व म्हशी अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. गो-जातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतेही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, संपर्कात आलेली वैरण व अन्य साहित्य आणि प्राण्यांचे उत्पादन नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा व प्रदर्शन आयोजित करणे किंवा अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम पार पाडण्यास मनाई करण्यात आले आहे, असे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.