प्रचाराच्या फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध !
By सुरेश लोखंडे | Published: April 21, 2024 05:14 PM2024-04-21T17:14:10+5:302024-04-21T17:14:18+5:30
फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध !
ठाणे : निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होते. सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यास आळा घालण्यासाठी प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही, सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे, तसे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी मुंबई पोलीस अधिनियमास अनुसरून जारी केले आहे.
सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक आदींना निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील, हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे ६ जूनपर्यंतअंमलात राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.